लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पक्षासह सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. भाजपाने आतापर्यंत सात याद्या जाहीर केल्या असून काही मतदारसंघाच्या याद्या अद्याप बाकी आहेत. अशातच अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपण लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. निवडणूक लढविण्यासाठी पैसे नसल्याने आपण ही निवडणूक लढविणार नसल्याचे निर्मला सीतारमण यांनी सांगितले आहे.

निर्मला सीतारमण काय म्हणाल्या?

“भारतीय जनता पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढविण्यासंदर्भात विचारण्यात आले होते. तामिळनाडू किंवा आंध्र प्रदेशमधून लोकसभा निवडणूक लढवा, असे भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सांगितले होते. यानंतर मी पक्षाने दिलेल्या प्रस्तावाबाबत १० दिवस विचार केला. मात्र, त्यानंतर १० दिवसांनी मी निवडणूक लढविणार नसल्याचे पक्षाला कळविले. यानंतर पक्षाने माझी विनंती मान्य केली. त्याबद्दल मी पक्षाचे आभार मानते”, असे निर्मला सीतारमण म्हणाल्या.

हेही वाचा : ‘लुटी’चा पैसा गरिबांना परत करणार! पश्चिम बंगालसाठी पंतप्रधान मोदी यांचे आश्वासन

निर्मला सीतारमण का निवडणूक लढविणार नाहीत?

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपण निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, “निवडणूक लढविण्यासाठी जेवढे पैसे लागतात, तेवढे पैसे माझ्याकडे नाहीत. मी अर्थमंत्री असले तरी निधी हा देशाचा असतो, माझा नाही. माझ्यासाठी माझा पगार, माझी कमाई आणि बचत आहे”, असे त्या म्हणाल्या.

भाजपाच्या उमेदवारांचा प्रचार करणार

निर्मला सीतारमण यांनी निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट केले असले तरी त्या भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचाराला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्या म्हणाल्या, “मी माध्यमांच्या आणि अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहे. याबरोबर सभांच्या माध्यमांतून प्रचारातदेखील सहभागी होणार आहे.”