नवी दिल्ली/ कोलकाता : पश्चिम बंगालमधील लोकांकडून लुटलेले आणि सक्तवसुली संचालनालयाने जप्त केलेले तीन हजार कोटी रुपये लोकांना परत कसे करता येतील, यावर आपण काम करीत आहोत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केले.

कृष्णानगर लोकसभा मतदारसंघातील तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार महुआ मोईत्रा यांच्या विरोधातील भाजपच्या उमेदवार अमृता रॉय यांच्याशी मोदी यांनी दूरध्वनी संभाषण केले. अमृता रॉय या पूर्वीच्या राजघराण्यातील आहेत. ईडीने पश्चिम बंगालमधून जप्त केलेली गैरव्यवहाराशी संबंधित रक्कम लोकांना परत करण्याचा विचार असल्याचे मोदी यांनी राजमाता अमृता रॉय यांना सांगितले, अशी माहिती भाजपच्या नेत्याने दिली. विरोधी पक्ष देशाला नाही तर सत्तेला प्राधान्य देतात, अशी टीकाही मोदी यांनी केल्याचे हा नेता म्हणाला. 

हेही वाचा >>> Lok Sabha Elections 2024 : संदेशखालीचा फायदा उठविण्याचा भाजपचा प्रयत्न यशस्वी होणार का ?

गरीबांकडून लुटलेला आणि ईडीने भ्रष्टाचाऱ्यांकडून जप्त केलेला पैसा गरिबांना परत करण्याच्या कायदेशीर पर्यायावर विचार करण्यात येत आहे, असे मोदी राजमाता अमृता रॉय यांना म्हणाले, असा दावा भाजपच्या या नेत्याने केला.

काँग्रेसवर टीकास्त्र

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्यधोरण गैरव्यवहारप्रकरणी अटक झाल्यानंतर काँग्रेसने त्यांना पाठिंबा दिला होता. त्यावरून पंतप्रधानांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. ज्यांनी ‘आप’विरोधात तक्रार केली होती, त्यांनी केजरीवाल यांना मदत करण्यासाठी आपला मार्ग बदलला आहे, असे मोदी म्हणाले. त्यांचे प्राधान्य सत्तेला आहे, देशाला नाही, असा आरोपही त्यांनी केला.     

नोकरीसाठी लाच

पंतप्रधान मोदी यांनी अमृता रॉय यांच्याशी केलेल्या दूरध्वनी संभाषणाचा तपशील भाजपने जाहीर केला आहे. त्यात पंतप्रधानांनी तीन हजार कोटी हा आकडाही सांगितला. हे तीन हजार कोटी पश्चिम बंगालमधील लोकांनी नोकरी मिळवण्यासाठी लाच म्हणून दिले होते, असे मोदी म्हणाल्याचे भाजपच्या नेत्याने सांगितले.