FATF on Pahalgam Terror Attack: जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तब्बल २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता आणि अनेक पर्यटक जखमी झाले होते. या घटनेनंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ ठिकाणी दहशतवादी तळांवर हल्ला करत जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला होता. मात्र, त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाली आणि तणाव काहीसा निवाळला.
दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक देशांच्या प्रतिक्रिया देखील समोर आल्या होत्या. भारताने दहशतवादविरोधी भूमिका जगासमोर देखील मांडली. दरम्यान, आता पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंदर्भात फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स अर्थात एफएटीएफची प्रतिक्रिया समोर आली आहे. एफएटीएफने २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. तसेच दहशतवादी समर्थकांमध्ये पैशांशिवाय आणि पैशांच्या हस्तांतरणाच्या साधनांशिवाय हे हल्ले होऊ शकत नाहीत, असं म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.
दहशतवादी समर्थकांमध्ये पैशांशिवाय आणि निधी हस्तांतरणाच्या साधनांशिवाय अशा प्रकारचे हल्ले शक्य नसल्याचं एफएटीएफने म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे. दरम्यान, पहलगाम येथे झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याचा एफएटीएफ गंभीर चिंता व्यक्त करत असून या हल्ल्याचा निषेध करत असल्याचंही एफएटीएफने म्हटलं आहे.
पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाकण्यासाठी भारत दबाव आणणार?
भारत एफएटीएफच्या मनी लाँड्रिंग आणि दहशतवाद वित्तपुरवठा विरोधी मार्गदर्शक तत्त्वांनुसार पाकिस्तानच्या कथित उल्लंघनांवर आणि त्रुटींवर सविस्तर कागदपत्रे भारत तयार करत असल्याचं सांगितलं जात आहे. पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाकण्यासाठी भारताने औपचारिकपणे दबाव आणण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातं.
FATF म्हणजे काय?
FATF अर्थात Financial Action Task Force या संस्थेला जगभरात दहशतवाद्यांना होणाऱ्या अर्थपुरवठ्यावर नजर ठेवणारी संस्था म्हणून ओळखलं जातं. दुसऱ्या शब्दांत, ही संस्था एक अशी यंत्रणा नियंत्रित करते, ज्याद्वारे जगभरात अव्याहतपणे वाहणारा पैसा दहशतवादी कारवायांसाठी वापरला जाण्यापासून रोखला जातो. आंतरराष्ट्रीय स्तरावरील आर्थिक गैरव्यवहार, दहशतवादी कारवायांना अर्थपुरवठा आणि आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेला असणाऱ्या धोक्यांपासून बचाव करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या इतर सर्व बाबींवर ही संस्था नजर ठेवून असते. त्यासंदर्भात इतर देशांसाठी आवश्यक ते नियम, मार्गदर्शक सूची आणि अंमलबजावणीचे निर्देश या संस्थेमार्फत नमूद केले जातात.
‘ग्रे लिस्ट म्हणजे काय?
ग्रे लिस्ट म्हणजे नेमकं काय? FATF ही ‘ग्रे लिस्ट’ तयार करते. FATF च्या मते जे देश आंतरराष्ट्रीय आर्थिक गैरव्यवहार रोखण्यात सातत्याने अपयशी ठरतात, दहशतवादी कारवायांना होणारा अर्थपुरवठा रोखू शकत नाहीत आणि त्यामुळेच जागतिक स्तरावर सातत्याने टीकेचे धनी ठरतात, अशा देशांचा या यादीत समावेश केला जातो.