मध्य प्रदेशची राजधानी असणाऱ्या भोपाळमध्ये करोना कालावधीत आंदोलन करुन शासकीय आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री आणि राज्य सभेचे खासदार दिग्विजय सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिग्विजय यांच्यासोबतच माजी मंत्री पीसी शर्मा, काँग्रेस जिल्हा अध्यक्ष कैलाश मिश्रांसहीत २०० जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आलीय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अशोक गार्डन पोलीस स्थानकामध्ये कमल १८८, १४७ आणि २६९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. माजी मुख्यमंत्री दिग्वजिय सिंह यांच्यासोबत पीसी शर्मा, काँग्रेस जिल्हा अध्यक्षांसोबतच १० लोकांच्या नावाचा यामध्ये थेट उल्लेख आहे. तर आंदोलनाच्या ठिकाणी गर्दी करणाऱ्या २०० अज्ञातांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आलाय. व्हिडीओंच्या माध्यमातून या २०० जणांची ओळख पटवली जात आहे. दिग्वजिय सिंह हे गोविंदपुरा औद्योगिक परिसरामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची लघु उद्योग संस्था असणाऱ्या भारती संस्थेला १० हजार वर्ग फूट जमीन देण्याच्या निर्णयाविरोधात आंदोलन करत होते. गुन्हा दाखल केल्याची माहिती भोपाळच्या सहाय्यक पोलीस निरिक्षकांनी एएनआयशी बोलताना दिली.

यावेळी पोलिसांनी बॅरिकेट्स लावून आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा दिग्विजय यांच्यासहीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी बॅरिकेट्सवर चढण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी वॉटर कॅननच्या मदतीने आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला.

भोपाळमधील गोविंदपुरा इंडस्ट्रियल एरियामध्ये गोविंदपुरा इंडस्ट्रीज असोसिएशनचं कार्यालय आहे. या कार्यालयाच्यासमोर १० हजार वर्ग फूट आकारमान असणारं एक पार्क आहे. दिग्विजय सिंह यांनी आरोप केला आहे की पार्कची जमीन सरकारने चुकीच्या पद्धतीन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित भारती या कंपनीला दिली आहे. या ठिकाणी भारतीचं कार्यालय उभारलं जाणार असल्याचंही दिग्विजय सिंह म्हणाले आहेत. रविवारी या ठिकाणी भारती लघु उद्योग कार्यालयाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या कार्यक्रमाला विरोध करण्यासाठी दिग्विजय सिंह आणि त्यांचे सहकारी गोविंदुपामध्ये पोहचले आणि तिथे त्यांची पोलिसांसोबत झटापट झाली.

भारती लघु उद्योगच्या भूमिपूजनादरम्यान उपस्थित असणारे मध्य प्रदेश भाजपाचे आरोग्य शिक्षण मंत्री विश्वास सारंग यांनी दिग्विजय सिंह यांचं आंदोलन हे वायफळ असल्याची टीका केली. विश्वास सारंग यांनी काँग्रेसला चांगल्या कामाचा त्रास होतो अशीही टीका केली. भारती लघु उद्योगचं कार्यालय सर्व नियमांचं पालन करुन उभारलं जात आहे. कर्मचारी प्रशिक्षण आणि इतर काम या ठिकाणी केली जातील असंही मंत्र्यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fir against 8 people including digvijaya singh 200 others for violating covid norms during congress protest scsg
First published on: 12-07-2021 at 10:10 IST