FIR Registered Against Driver Of Rahul Gandhi: बिहारमधील नवादा जिल्ह्यात ‘मतदार अधिकार यात्रे’ दरम्यान एका पोलीस कर्मचाऱ्याला धडक दिल्याने लोकसभे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या गाडीच्या चालकाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी गुरुवारी माहिती दिली.
मंगळवारी राहुल गांधी यांचा ताफा भगतसिंग चौकातून जात असताना ही घटना घडली होती. या घटनेतील पीडित कर्मचाऱ्याला राहुल गांधींच्या गाडीचा धक्का लागल्याने तो खाली पडला आणि यात त्याला दुखापत झाली.
एफआयआर दाखल झाल्याच्या वृत्ताला दुजोरा देताना, नवादाचे पोलीस अधीक्षक अभिनव धीमान म्हणाले, “हो, ड्रायव्हरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची अधिक माहिती योग्य वेळी दिली जाईल.”
भाजपाचा आरोप
या घटनेनंतर भारतीय जनता पार्टीने राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती. एक्सवरील एका पोस्टमध्ये, भाजपा प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये राहुल गांधींना घेऊन जाणारी गाडीचा एका पोलीस कर्मचाऱ्याला धक्का लागल्याचे दिसत आहे. गाडीच्या धक्क्याने जखमी झालेला तो पोलीस नंतर लंगडताना दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला होता.
“राहुल गांधींच्या गाडीने एका पोलीस कर्मचाऱ्याला चिरडले ज्या तो गंभीर जखमी झाला होता. राजघराण्यातील व्यक्ती त्यांची चौकशी करण्यासाठीही खाली उतरला नाही”, असा आरोप पूनावाला यांनी त्यांच्या पोस्टमध्ये केला आहे.
राहुल गांधींकडून कर्मचाऱ्याची विचारपूस
भाजपाने आरोप केला असला तर, राहुल गांधी जखमी कर्मचाऱ्याची विचार करत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, राहुल गांधी त्यांचे वाहन थांबवून, त्यांच्या समर्थकांना जखमी कर्मचाऱ्याला त्यांच्या उघड्या जीपमध्ये आणण्यास सांगत आहेत आणि त्यांना पाणी देत आहेत.