तमिळनाडूचे क्रीडा आणि युवक व्यवहार मंत्री आणि मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचा मुलगा तसेच अभिनेते उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावरून देशभरातून गदारोळ झाला होता. आता उदयनिधी स्टॅलिन आणि प्रियांक खरगे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

काय म्हणाले होते उदयनिधी स्टॅलिन?

शनिवारी (२ सप्टेंबर) उदयनिधी स्टॅलिन यांनी एका कार्यक्रमात बोलताना सनातन धर्माचं उच्चाटन करण्याची भूमिका मांडली होती. “सनातन धर्म हा समानता व सामाजिक न्यायाच्या विरोधात आहे. काही गोष्टींना विरोध करण्याऐवजी त्यांचं उच्चाटन केलं जायला हवं. डास, डेंग्यू, मलेरिया आणि करोनासारख्या आजारांना विरोध केला जाऊ कत नाही. त्यांचं उच्चाटनच केलं जायला हव. त्याचप्रमाणे सनातन धर्माचंही व्हायला हवं”, असं विधान उदयनिधी यांनी चेन्नईत एका कार्यक्रमात केलं. तर, उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्याचं मल्लिकार्जुन खरगे यांचे सुपूत्र प्रियांक खरगे यांनी समर्थन केलं होतं.

हेही वाचा >> शिरच्छेदासाठी १० कोटींचं बक्षीस लावणाऱ्या परमहंस आचार्यांना उदयनिधींचं प्रत्युत्तर म्हणाले, “मी स्वतः…”

याप्रकरणी उदयनिधी आणि प्रियांक खरगे यांच्याविरोधात वकील हर्ष गुप्ता आणि रामसिंग लोधी यांनी तक्रार केली होती. या तक्रारीवरून दोघांवर मंगळवारी उत्तर प्रदेशातील रामपूर येथील सिव्हिल लायन्स पोलिस ठाण्यामध्ये आयपीसीच्या कलम २९५ ए (धार्मिक भावना भडकवण्यासाठी हेतुपुरस्सर आणि दुर्भावनापूर्ण कृत्ये) आणि १५३ ए (विविध धार्मिक गटांमधील वैर वाढवणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाद उफाळल्यानंतर काय दिलं होतं स्पष्टीकरण?

“मी माझ्या वक्तव्याचा महत्त्वाचा भाग पुन्हा उद्धृत करतो. ज्याप्रमाणे कोविड १९ चा प्रादुर्भाव होतो किंवा डासांमुळे डेंग्यू आणि मलेरियासारखे रोग पसरतात, त्याप्रमाणे सनातन धर्मदेखील अनेक सामाजिक समस्या निर्माण करण्यास जबाबदार आहे”, असे स्पष्टीकरण उदयनिधी यांनी ट्विटरवर दिले आहे.