विजयादशमी म्हणजेच दसरा हा सण सर्वत्र उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी प्रभु श्रीरामाने रावणाचा वध केल्याचे सांगितले जाते. शिवाय शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी शस्त्रपूजन देखील केले जाते. देशभरात विविध ठिकाणी रावण दहनासह शस्त्रपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. याच पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी एका शाळेच्या आवारात हवेत केलेल्या गोळीबाराबद्दल त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर येथे विजयादशमीच्या दिवशी ८ ऑक्टोबर रोजी विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या जवळपास १५० कार्यकर्त्यांनी शस्त्रपूजनादरम्यान एका शाळेच्या आवारात हवेत गोळीबार केल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शस्त्रपूजेदरम्यान कार्यकर्ते गोळीबार करत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.