भारतीय सैन्य दलाच्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी भाजपाचे मध्य प्रदेशचे मंत्री कुंवर विजय शाह यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर न्यायालयानेच शाह यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. ज्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. कर्नल सोफिया कुरेशी यांनी जेव्हा भारताने पाकिस्तानवर कशी कारवाई केली? एअर स्ट्राईक आणि सर्जिकल स्ट्राईक करत कसं चोख उत्तर दिलं याची माहिती दिली. त्या मोहिमेत त्या देखील सहभागी होत्या. ही बातमी समोर आल्यानंतर सोफिया कुरेशी यांचा सगळ्या देशाला अभिमान वाटला होता, आजही तो अभिमान कायम आहे. मात्र कुंवर विजय शाह यांनी त्यांच्याबाबत अपमानास्पद वक्तव्य केलं.

कुंवर विजय शाह यांनी काय म्हटलं होतं?

“आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे समाजासाठी जगत आहेत. दहशतवाद्यांनी हल्ला करुन आपल्या माता भगिनींचं कुंकू पुसलं. अशा सगळ्यांच्या बहिणीला पाठवून आपण त्यांचा बदला घेतला. त्यामुळे मोदींसाठी टाळ्या वाजवा.” असं म्हणत कुंवर विजय शाह यांनी सोफिया कुरेशी यांना दहशतवाद्यांची बहीण संबोधलं होतं. कुंवर विजय शाह यांच्या या आक्षेपार्ह टिप्पणीवरून न्यायालयाने त्यांना चांगलंच फटकालं. तसेच अशा प्रकारची टिप्पणी धोकादायक असल्याचं निरीक्षण नोंदवत त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले होते. ज्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता कुंवर विजय शाह यांच्या अडचणी वाढल्या आहेत. कलम १५२, कलम १९६ (१) आणि कलम १९७ (१) (क) या अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

न्यायालयाने काय म्हटलं होतं?

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती अतुल श्रीधरन आणि न्यायमूर्ती अनुराधा शुक्ला यांच्या खंडपीठाने या संदर्भात असं निरीक्षण नोंदवलं की, प्रथमदर्शनी असं दिसून येत आहे की, पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरून कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत मंत्री कुंवर विजय शाह यांनी केलेलं विधान हे फुटीरतावादी कारवायांच्या भावनांना प्रोत्साहन देणारं आणि भारताचे सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता धोक्यात आणणारं असल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे.

काँग्रेसची जोरदार टीका

काँग्रेसकडून त्यांच्या या विधानाचा चांगलाच समाचार घेण्यात आला. मध्यप्रदेश काँग्रेसने मंत्री कुंवर विजय शाह यांच्या वक्तव्याला लज्जास्पद म्हटले. “भारताची मुलगी, जिच्यावर आपल्या सगळ्यांना अभिमान आहे. हा भ्रमिष्ट आणि अज्ञानी मंत्री तिला दहशतवाद्यांची आणि त्यांच्या समाजाची बहीण म्हणत आहे”, असं म्हणत काँग्रेसचे प्रवक्ते अभिनव बरोलिया यांनी जोरदार टीका केली. आता या प्रकरणी कुंवर विजय शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.