हरियाणातील सुनपेढ गावामध्ये घराला आग लागून दोन लहान मुलांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. पीडित मुलांच्या घरामध्ये बाहेरून आग लावण्यात आली नसून, घरातीलच एखाद्या वस्तूमुळे आग लागल्याचे न्यायवैद्यक प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालात म्हटले आहे. प्रयोगशाळेच्या अधिकाऱ्यांना घरामध्ये रॉकेलचा अर्धवट भरलेला एक डबाही आढळला. घरातील दिवाणाखाली हा डबा ठेवण्यात आला होता. या अहवालामुळे या घटनेच्या तपासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाकडून या घटनेची चौकशी करण्यात येते आहे.
सुनपेड गावात उच्चवर्णीय जमावाकडून दलित कुटुंबाचे घर जाळण्यात आल्याची माहिती पुढे आल्याने देशभर त्याविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. पूर्ववैमनस्यातूनच ठाकूर समाजातील नऊ जणांच्या टोळक्याने दलित कुटुंबाचे घर जाळल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. दलित कुटुंबातील जितेंद्र हे व्यवसायाने डॉक्टर आहेत. त्यांची पत्नी रेखा आणि वैभव व दिव्या ही लहान मुले घर पेटवून देण्यात आले तेव्हा घरात होते. दरम्यान, या घटनेनंतर सर्वांना सफदरगंज रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यावेळी डॉक्टरांनी वैभव आणि दिव्या यांना मृत घोषित केले. जितेंद्र यांनी पोलीसांना दिलेल्या जबानीत गावातील काही लोकांनी आपल्या घरावर हल्ला केल्याचे म्हटले आहे.