अमेरिकेत शाळेमध्ये करण्यात आलेल्या गोळीबारात तिघांचा मृत्यू झाला आहे. हल्लेखोराने सेंट ल्युईस हायस्कूलमध्ये घुसून अंदाधुंद गोळीबार केला. सोमवारी सकाळी करण्यात आलेल्या या गोळीबारात एका मुलीसह तिघांचा मृत्यू झाला आहे. AP च्या वृत्तानुसार, हल्ल्यात सहाजण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. दरम्यान पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत हल्लेखोर ठार झाला आहे.
सेंट्रल व्हिज्युअल अँड परफॉर्मिंग आर्ट्स हायस्कूलमध्ये सकाळी ९ वाजता गोळीबार सुरु झाल्यानंतर मुलांची एकच धावपळ सुरु झाली होती. जीव वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांनी खिडकीतून खाली उड्या मारल्या. एका मुलीने आपण हल्लेखोराच्या समोर आलो होतो, पण त्याची बंदूक अडकली आणि आपण पळून जाण्यात यशस्वी ठरल्याचं सांगितलं आहे.
पोलीस आयुक्त मायकल सॅक यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर २० वर्षांचा होता. मात्र त्यांनी त्याचं नाव उघड करण्यास नकार दिला. मृत्यू झालेली महिला शिक्षिका होती का याबाबत त्यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही.
हल्लेखोराकडे बंदूक कशी आली? तसंच तो शाळेत कसा गेला? याबाबत पोलिसांनी अधिक माहिती दिलेली नाही. दरम्यान, हल्लेखोर शाळेत घुसल्याची माहिती मिळताच विद्यार्थ्यांनी तीन माळ्यांच्या इमारतीमधून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु झाले होते. यानंतर अधिकाऱ्यांनी हल्लेखोराच्या दिशेने धाव घेत त्याला व्यस्त ठेवलं आणि अखेर ठार करण्यात आलं.