करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या भारताला मदत करण्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी आश्वासन दिलं होतं. त्यानुसार, भारतात मदत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारी सकाळी अमेरिकेतून भारतात विमान दाखल झालं असून यामध्ये करोनाशी लढण्यासाठी वैद्यकीय मदत पाठवण्यात आली आहे. पुढील काही आठवड्यांमध्ये अजून काही विमानं मदत घेऊन भारतात दाखल होतील.

Covid: “तात्काळ भारत सोडा,” अमेरिकेचा नागरिकांना संदेश

अमेरिकेच्या हवाई दलाचं सुपर गॅलॅक्सी विमान शुक्रवारी सकाळी नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झालं. या विमानातून ४०० ऑक्सिजन सिलेंडर्स, रुग्णालयांसाठी लागणारं वैद्यकीय साहित्य तसंच १० लाख रॅपिट करोना टेस्ट किट पाठवण्यात आलं आहे. एएफपीने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

भारताच्या मदतीसाठी अमेरिका तत्पर

भारतातील अमेरिकी दुतावासाने ट्विट केलं असून यावेळी फोटो शेअर केले आहेत. ट्विट करताना त्यांनी म्हटलं आहे की, “अमेरिकेतून आणीबाणीच्या कोविड संकटाशी लढण्यासाठी मदतीची पहिली खेप भारतात आली आहे. ७० वर्षांपासून एकमेकांना सहकार्य करत असून करोना संकटाशी लढा देण्यासाठी अमेरिका खंबीरपणे भारतासोबत आहे”.

“आम्हाला गरज असताना भारताने मदत केली आहे त्यामुळे आता करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संकटात असताना आम्ही भारताला सर्वतोपरी मदत करू,” असं आश्वासन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या दूरध्वनी संभाषणानंतर दिलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताला आपत्कालीन मदतीशिवाय साधनसामुग्रीही पुरवण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं होतं. पंतप्रधान मोदी व बायडेन यांच्यात दूरध्वनी संभाषण झालं होतं. करोनाच्या दुसऱ्या साथीत भारत अडचणीत असताना अमेरिका संथ प्रतिसाद देत असल्याची टीका बायडन प्रशासनावर झाली होती. त्यानंतर अमेरिकेने भारताला मदत करण्याची तयारी दर्शवण्यात आली होती. लशीसाठी लागणारे घटक किंवा कच्चा माल पुरवण्याचंही अमेरिकेने मान्य केलं होतं. अमेरिकेची गरज भागल्यानंतरच भारताचा विचार करण्यात येईल अशी भूमिका बायडेन प्रशासनाने या आधी घेतली होती.