सध्या संपूर्ण देश करोना विषाणूशी लढतो आहे. परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण देशात ३ मे पर्यंत लॉकडाउन वाढवलं आहे. सध्याचा काळ खडतर असला तरीही समाजातील अनेक लोकं, गरीब व गरजू व्यक्तींना मोफत अन्नधान्य, औषध, मास्क पुरवण्यासाठी पुढे येत आहेत. अनेक लहान मुलं आपल्या खाऊचे पैसे सहायता निधीसाठी दान करत आहेत. अशावेळी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या पत्नीनेही करोनाविरुद्ध लढ्यात सहभाग नोंदवला आहे. सविता कोविंद यांनी राष्ट्रपती भवनातील ‘शक्ती हात’ परिसरात दिल्लीतील शेल्टर होमसाठी मास्क शिवण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या पदाचा कोणताही मान-सन्मान न बाळगता सविता कोविंद या एका सामान्य गृहिणीप्रमाणे शिवणयंत्रावर मास्क शिवण्याचं काम करत आहेत. ANI वृत्तसंस्थेने कोविंद यांचा मास्क शिवतानाचा फोटो प्रसिद्ध केला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही आपल्या एका महिन्याचा पगार करोनाविरुद्ध लढ्यात पंतप्रधान सहायता निधीला मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात सरकारला अद्याप यश आलेलं नाही. अजुनही या विषाणूवर ठोस औषध मिळालेलं नसल्यामुळे सर्व वैद्यकीय यंत्रणा या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत.