शाहीर व विद्रोही कवी म्हणून समाजात वावरणारे व प्रत्यक्षात नक्षलवादी चळवळीत सक्रिय असलेले शीतल साठे व सचिन माळी सध्या अटकेत असले तरी पुणे परिसरातील आणखी पाच तरुण उत्तर गडचिरोलीच्या जंगलात सशस्त्र नक्षलवादी म्हणून सध्या कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती शरणागत नक्षलवाद्यांच्या जबाबातून समोर आली आहे. चळवळीत दाखल होण्याआधी हे सर्व तरुण पुण्याच्या कबीर कला मंचमध्ये सक्रिय होते, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
शीतल व सचिन यांच्यासह आणखी काही तरुणांना अँजेलाने पुण्यातून थेट उत्तर गडचिरोलीच्या जंगलात पाठवल्याची माहिती निष्पन्न झाली आहे. पुण्याचा प्रशांत जालिंदर कांबळे हा तरुण चळवळीत ‘मधू’ व ‘लॅपटॉप’ नावाने सध्या कार्यरत आहे. लॅपटॉप व मोबाइल दुरुस्तीच्या कामात तरबेज असल्याने त्याला हे टोपणनाव मिळाले आहे. जंगलातही त्याच्याकडून ही दुरुस्तीची कामे करून घेतली जातात. अँजेलाला अटक झाल्यानंतर या नावाची माहिती पोलिसांना कळताच या चळवळीसाठी शहरी भागांत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी प्रशांतच्या वडिलांना तो बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात करायला लावली. त्यावरून पुणे पोलिसांनी गुन्हासुद्धा नोंदवला. दुसऱ्या तरुणाचे नाव संतोष वसंत शेलार असून, तो कासेवाडीचा आहे. या तरुणाची चौकशी पोलिसांनी करताच त्याच्या कुटुंबीयांनीसुद्धा खडक पोलीस ठाण्यात दोन वर्षांपूर्वी तो बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. संतोष हा कलाकार असून, तो स्केचेस काढतो तसेच पेंटिंगसुद्धा करतो. त्याला चळवळीत पेंटर ऊर्फ विश्व हे नाव देण्यात आले आहे.
वर्षांपूर्वी उत्तर गडचिरोलीतील खोब्रामेंढाच्या जंगलात पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली होती. यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून काही पेंटिग्ज व स्केचेस हस्तगत केली होती. ती सर्व संतोषने काढली होती, असा जबाब गेल्या महिन्यात गडचिरोलीत समर्पण केलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिसांना दिला आहे. या दोघांशिवाय पुणे व परिसरातील सागर गोरखे हा तरुण योगेश या नावाने, तर रमेश गायचोर हा तरुण आकाश या नावाने, तर रूपाली जाधव ही तरुणी प्रियंका या नावाने सध्या चळवळीत सक्रिय असल्याची माहिती या जबाबात मिळाली आहे. या तरुणांना चळवळीत ओढण्यात शीतल साठे व सचिन माळी यांचाही सहभाग होता असा पोलिसांचा दावा आहे. हे तरुण जंगलात दीपक या नावाने वावरणाऱ्या मिलिंद तेलतुंबडेसोबत असतात, अशीही माहिती आहे.
कयासावर शिक्कामोर्तब
 पुण्यातील कबीर कला मंच ही संघटना नक्षलवादी चळवळीचे प्रवेशद्वार म्हणून सक्रिय होती. अँजेलाच्या अटकेपासून बेपत्ता असलेले हे तरुण जंगलात सक्रिय असावेत, असा आमचा कयास होता. आता शरणागत नक्षलवाद्यांच्या जबाबातून त्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे पोलीस उपमहानिरीक्षक रवींद्र कदम यांनी सांगितले.