अपेक्षित कामगिरी करू न शकल्यामुळे भारतातील आघाडीची इ कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने सुमारे ३०० कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. कंपनीने अचानक कारवाई केल्याने अनेक कर्मचाऱ्यांना धक्का बसला आहे. परंतु कंपनीचे सहसंस्थापक सचिन बन्सल यांनी या कारवाईचे समर्थन केले असून मलाही अपेक्षित कामगिरी न केल्यामुळे पदावरून पायउतार व्हावे लागल्याचे म्हटले आहे.
शुक्रवारी झालेल्या कंपनी कर्मचाऱ्यांच्या बैठकीत बन्सल यांनी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, आता कपंनीची धोरणे बदलले आहेत. मलाही पदावरून हटवण्यात आले होते. आपण दिलेले उद्दिद्ष्ट पूर्ण करू शकलेलो नाही. त्यामुळे व्यवस्थापनातील सर्वच घटकांना याची किंमत मोजावी लागली आहे. मलाही अपेक्षित कामगिरी अभावी कंपनीने जानेवारी महिन्यात सीईओ पदावरून हटवले होते, असेही त्यांनी या वेळी म्हटले.
या वेळी कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापनाबाबत नाराजी व्यक्त केली. व्यवस्थापनाने घेतलेल्या निर्णयाचे चुकीचे परिणाम होतात. त्याचा फटका आम्हाला का असा प्रश्न त्यांनी सचिन यांना विचारला. परंतु सचिन यांच्या स्पष्टीकरणानंतर कर्मचाऱ्यांनी टाळ्याच्या गजरात निर्णयाचे स्वागत केले.
सध्या बिन्नी बन्सल यांच्याकडे कंपनीचे प्रमुखपद आहे. सचिन आणि बिन्नी हे दोघे पूर्वी अॅमेझॉन कंपनीत काम करत होते. दोघांनी वर्ष २००७ मध्ये फ्लिपकार्ट कंपनीची स्थापना केली होती.