Taslima Nasreen On Taliban Press Conference: तालिबानचे नेते आणि अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री अमीर खान मुत्ताकी भारत दौऱ्यावर आले आहेत. शुक्रवारी त्यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याबरोबर बैठक घेतल्यानंतर पत्रकार परिषदेला संबोधित केले. दिल्लीत झालेल्या या पत्रकार परिषदेला महिला पत्रकारांना उपस्थित राहण्यास परवानगी दिली नाही. या घटनेनंतर आता भारत सरकारवर विरोधक टीका करत आहेत. दरम्यान निर्वासित बांगलादेशी लेखिका आणि महिलांच्या अधिकारासाठी आवाज उचलणाऱ्या तस्लीमा नसरीन यांनी यावरून तालिबानच्या राजवटीवर टीका केली.
१९९४ साली बांगलादेशमधून बाहेर पडलेल्या तस्लीमा नसरीन भारतात आल्या. महिलांच्या हक्क आणि अधिकारासाठी त्या नेहमीच पुढाकार घेत असतात. दिल्लीमधील पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना आत प्रवेश दिला नाही. या घटनेवर बोलताना त्या म्हणाल्या, तालिबान महिलांना मानवी हक्क देण्यास तयार नाही. कारण ते महिलांना माणूस मानतच नाहीत.
यावेळी दिल्लीत तालिबानी नेत्यांच्या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिलेल्या पुरूष पत्रकारांवरही त्यांनी टीका केली. त्या म्हणाल्या, जर त्यांच्यात थोडा जरी विवेक असता तर त्यांनी पत्रकार परिषदेत न जाण्याचा निर्णय घेतला असता.
तस्लीमा नसरीन पुढे म्हणाल्या, अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री भारतात येऊन पत्रकार परिषद घेतात आणि ते भारताच्या महिला पत्रकारांना पत्रकार परिषदेत येऊ देत नाहीत. तालिबानच्या इस्लाममध्ये, महिलांना फक्त घरात राहणे, मुले जन्माला घालणे आणि त्यांच्या पतीची व मुलांची सेवा करणे एवढेच काम आहे. महिलाद्वेषी पुरुष महिलांना घराबाहेर पडू देत नाहीत.
महिलांना मानवी हक्क नाकारले
“अफगाणिस्तानमध्ये मुलींना शाळेत जाण्यास बंदी, महिलांना बाहेर काम करण्यास परवानगी नाही. तालिबानी महिलांना मानवी हक्क देण्यास तयार नाहीत, कारण ते महिलांना मानव मानत नाहीत. महिलाद्वेषावर उभे राहिलेले राज्य हे क्रूर राज्य आहे. कोणत्याही सुसंस्कृत राष्ट्राने असा देशाला मान्यता देऊ नये”, असेही तस्लीमा नसरीन म्हणाल्या आहेत.
परराष्ट्र मंत्रालयाने हात झटकले
दरम्यान परराष्ट्र मंत्रालयाने आज एक निवेदन जाहीर करत अफगाणिस्तानच्या नेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेपासून हात झटकले आहेत. या पत्रकार परिषदेच्या आयोजनात आपला कोणताही सहभाग नव्हता, असे स्पष्ट करण्यात आले आहे. सदर पत्रकार परिषद अफगाणिस्तानच्या दूतावासात आयोजित करण्यात आली होती.
ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबानने अफगाणिस्तानची सत्ता ताब्यात घेतली. तेव्हापासून महिलांवर अनेक बंधने लादण्यात आली आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या मते अफगाणी महिलांना आणि मुलींना जगातील इतर देशांपेक्षा सर्वात गंभीर प्रश्नांना सामोरे जावे लागते. तालिबानने सत्ता प्राप्तीनंतर महिलांवरील निर्बंध अधिक कडक केले असून त्यात वाढ केली आहे. भारतातही त्यांनी महिला पत्रकारांना दूर ठेवल्यामुळे आता टीका होऊ लागली आहे.
कोण आहेत तस्लिमा नसरीन?
तस्लिमा नसरीन या वादग्रस्त बांगलादेशी लेखिका आहेत. ‘लज्जा’, ‘फेरा’, ‘बेशरम’ या त्यांच्या कादंबऱ्या गाजल्या आहेत. त्यांनी मुस्लीम समाजातील अनिष्ट प्रथांवर ताशेरे झाडल्याने त्यांना बांगलादेशातून बहिष्कृत करण्यात आले होते. त्यांच्याविरोधात जारी करण्यात आलेल्या फतव्यामुळे त्यांना बांगलादेश सोडावा लागला. मात्र भारताविषयी त्यांच्या मनात आदर आणि प्रेम आहे. भारताने त्यांना आश्रय दिला.