नवी दिल्ली : ‘‘ऊर्जा व्यापार दिवसेंदिवस संकुचित होत चालला आहे. व्यापारी तत्त्वे निवडक पद्धतीने लागू केली आहेत आणि जे बोलले जाते, त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होतेच असे नाही,’’असे प्रतिपादन परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पूर्व आशियायी शिखर परिषदेत (ईएएस) केले.
जयशंकर यांनी रविवारी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांची भेट घेतल्यानंतर काही तासांनी ‘ईएएस’मध्ये बोलताना अमेरिकेच्या धोरणांबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यामागे अमेरिकेने भारतावर लादलेल्या अतिरिक्त २५ टक्के आयातशुल्काची पार्श्वभूमी होती.
दुर्मीळ खनिजांच्या निर्यातीवर निर्बंध लादण्याच्या चीनच्या पार्श्वभूमीवर जयशंकर यांनी पुरवठा साखळी आणि त्याचा जागतिक पातळीवर झालेला परिणाम यावर भाष्य केले. ते म्हणाले, पुरवठा साखळीच्या विश्वासार्हतेवर चिंता निर्माण करणारी स्थिती आहे. तंत्रज्ञानातील प्रगती अतिशय स्पर्धात्मक झाली आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीच्या शोध अधिक स्पर्धात्मक झाला आहे. जग या नव्या परिस्थितीला अपरिहार्यतेने प्रतिसाद देईल. त्यासाठी आवश्यक तडजोडी होतील. नव्या संधी निर्माण होतील. समस्यांवर लवचीक उपाय शोधले जातील. जगामधील बहुध्रुवीयता वाढत जाणार असून या सर्व स्थितीवर जागतिक स्तरावर अतिशय गांभीर्याने चर्चा व्हायला हवी, असे आवाहन जयशंकर यांनी केले.
दहशतवादाच्या मुद्द्यावरही जयशंकर यांनी भारताच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले, ‘‘जगाला दहशतवादाचा धोका आहे. दहशतवादाबाबत जगाने ‘शून्य सहिष्णूता’ दाखवायली हवी. तेथे द्विधा मनस्थिती नको. दहशतवादाविरोधात स्वतःचे संरक्षण करण्यासाठीच्या आमच्या हक्कामध्ये कधीही तडजोड केली जाऊ शकत नाही.’’
ऊर्जा व्यापार हा संकुचित होत चालला आहे. त्याचा परिणाम बाजार विस्कळीत होण्यात झाला आहे. व्यापारी तत्त्वे निवडक पद्धतीने लागू केली जात आहेत आणि जे बोलले जाते, त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होतेच असे नाही. – एस. जयशंकर, परराष्ट्रमंत्री
‘दहशतवादाविरोधात संरक्षणाच्या हक्कांत तडजोड नाही’
पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर जयशंकर म्हणाले, ‘जगाला दहशतवादाचा धोका आहे. दहशतवादाबाबत जगाने ‘झिरो टॉलरन्स’ दाखवायला हवा. तेथे द्विधा मनस्थिती नको. दहशतवादाविरोधात स्वतःचे संरक्षण करण्यासाठीच्या आमच्या हक्कामध्ये कधीही तडजोड केली जाऊ शकत नाही.’
जयशंकर, रुबिओ चर्चा
क्वालालंपूर : परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सोमवारी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांच्याबरोबर चर्चा केली. अमेरिकेने भारतावर लादलेल्या वाढीव करांच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा झाली. द्विपक्षीय संबंध, प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती जयशंकर यांनी समाजमाध्यमात टिप्पणी करून दिली. दोन्ही नेत्यांमध्ये भारत-अमेरिकेतील संभाव्य व्यापार करारावरही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. रुबिओ यांच्याबरोबर मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम, सिंगापूरचे परराष्ट्रमंत्री व्हिव्हिआन बालकृष्णन आणि थायलंडचे परराष्ट्रमंत्री सिहसाक फुआंगकेतकेवाँ यांची भेट घेतली. जयशंकर यांनी न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सॉन आणि मलेशियाचे परराष्ट्रमंत्री महंमद हाजी हसन यांचीही स्वतंत्रपणे भेट घेतली.
संवाद, सहकार्य साधण्याचे आवाहन
क्वालालंपूर : जबरदस्तीऐवजी संवाद साधा आणि एकमेकांचा सामना करण्याची वेळ आली, तर सहकार्य करा, असे आवाहन मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी हिंद-प्रशांत भागातील नेत्यांना सोमवारी ‘ईएएस’ला सुरुवात करताना केले. अमेरिका-चीन यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले. अन्वर इब्राहिम म्हणाले, ‘आज आपण आपली उद्दिष्टे ठरवली पाहिजेत. सकारात्मकतेने संबंध प्रस्थापित करण्यासाठीच्या तत्त्वांचा पुरस्कार आपण केला पाहिजे. जागतिक शांतता, सुरक्षा, बहुस्तरावरील संवाद, आंतरराष्ट्रीय कायदा यावर आपण भूमिका निश्चित करायला हवी.’
