पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ सप्टेंबर २०२४ ला गणेश उत्सवाच्या दरम्यान त्यावेळी सरन्यायाधीश असलेल्या डी. वाय. चंद्रचूड यांच्या निवासस्थानी उपस्थिती दर्शवली होती. गणपतीची आरतीही त्यांनी केली होती. ज्यावरुन त्यावेळी सरन्यायाधीश पदावर असलेल्या चंद्रचूड यांच्यावर बरीच टीका झाली होती. त्याबाबत आता चंद्रचूड यांनी उत्तर दिलं आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड १० नोव्हेंबर २०२४ ला निवृत्त झाले आहेत. त्याआधीच्या काही महिन्यांमध्ये त्यांनी अनेक महत्त्वाच्या प्रकरणांवर सुनावणी केली. दरम्यान पंतप्रधान त्यांच्या घरी गेल्याने वाद निर्माण झाला होता. त्याबाबत प्रश्न विचारला असता आता चंद्रचूड यांनी उत्तर दिलं आहे.
काय म्हणाले डी. वाय. चंद्रचूड?
मुख्यमंत्री असोत किंवा पंतप्रधान असोत ते न्यायाधीशांच्या घरी जातात असा प्रघात आहे. त्यात चुकीचं किंवा गैरलागू असं काहीही नाही. मी २०१४ मध्ये उत्तर प्रदेश न्यायालयाचा न्यायाधीश होतो. माझ्या आईचं निधन झालं त्यावेळी अंत्यसंस्कार आटोपून मी घरी आलो तेव्हा मुख्यमंत्री असलेलेले अखिलेश यादव आणि त्यांच्या पत्नी डिंपल हे दोघंही माझ्या घरी आले होते. १० मिनिटं त्यांनी माझी विचारपूस केली. त्यानंतर ते त्यांच्या कामासाठी निघून गेले. अगदी याच प्रमाणे आम्हीही पंतप्रधानांच्या किंवा राज्यातील शासनकर्त्यांच्या घरी किंवा कार्यालयात जात असतो असं चंद्रचूड यांनी सांगितलं. लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत चंद्रचूड यांनी हे विधान केलं आहे.
जानेवारी २०१४ मधला तो प्रसंग…
चंद्रचूड पुढे म्हणाले, “मुख्य न्यायाधीशांची उच्च न्यायालयात नेमणूक होते तेव्हा मुख्य न्यायाधीश मुख्यमंत्र्यांच्या घरी जातात. त्यानंतर पुढच्या बैठकीला मुख्यमंत्री मुख्य न्यायाधीशांच्या घरी जातात. तुम्ही मुख्यमंत्र्यांना सांगत की आम्हाला निधीची गरज आहे, इमारतींच्या बांधकामांसाठी तो निधी कमी पडतोय. त्यावेळी मुख्यमंत्री हे म्हणत नाहीत की आम्ही निधी देतो तुम्ही आमची कायदेशीर प्रकरणं व्यवस्थित हाताळा. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली आहेत. राजकारणात एक प्रकारची प्रगल्भता आहे. त्यामुळे अशा गोष्टी घडत नाहीत. न्यायाधीश असोत किंवा राजकारणी त्यांच्यात ती प्रगल्भता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी गणपतीच्या वेळी घरी का आले होते?
मी दोन वर्षे देशाचा सरन्यायाधीश होतो, त्यावेळी पंतप्रधान माझ्या घरी आले होते हे सगळ्यांना माहीतच आहे. मी त्यांच्या कार्यालयात, त्यांच्या निवासस्थानी त्यांना भेटायचो. अनेकदा बैठकींचा अजेंडा असे. आमची बैठक झाल्यानंतर अनौपचारिक गप्पा होत असत. पंतप्रधान अगदी विरोधी पक्ष नेत्यांनाही सांगतात बसा पाच मिनिटं चहा घेऊ. त्याचप्रमाणे मलाही म्हणायचे. मला टेक्नॉलॉजी बाबत विचारायचे. माझी निवृत्ती जवळ आली होती तेव्हा मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारलं की तुम्ही माझ्या घरी गणपतीला याल का? त्यावर ते लगेच म्हणाले हो मी येईन. का येणार नाही? मी सरकारच्या विरोधातही निर्णय दिले आहेत. त्यांच्या बाजूनेही दिले आहेत. जे योग्य आहे ते मी केलं आहे.” असं चंद्रचूड यांनी म्हटलं आहे.