DY Chandrachud : भारताचे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांची दिल्ली येथील नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी (एनएलयू) मध्ये सुप्रतिष्ठ प्राध्यापकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता धनंजय चंद्रचूड हे विद्यार्थ्यांना कायद्याचे धडे देणार आहेत. एनएलयू विद्यापीठाने या संदर्भातील माहिती गुरुवारी (१५ मे) रोजी एका निवेदनाच्या माध्यमातून दिली आहे.

या संदर्भात जारी केलेल्या निवेदनात एनएलयू विद्यापीठ प्रशासनाने म्हटलं की, “नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी दिल्ली येथे सुप्रतिष्ठ प्राध्यापक म्हणून भारताचे माजी सरन्यायाधीश डॉ.धनंजय चंद्रचूड यांचं स्वागत करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. तसेच या नॅशनल लॉ विद्यापीठात कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे.”

एनएलयू विद्यापीठाच्या कुलगुरुंनी काय म्हटलं?

कुलगुरू जी एस बाजपेयी यांनी या निर्णयावर प्रतिक्रिया देताना हा निर्णय काद्याचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा क्षण ठरणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कुलगुरू जी एस बाजपेयी म्हणाले की, “भारतीय कायद्याच्या शिक्षणातील एक परिवर्तनकारी अध्याय म्हणून ही गोष्ट ठरणार आहे. जी कायदेतज्ज्ञांपैकी एक असलेले व्यक्ती कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या पुढच्या पिढीचं मार्गदर्शनासाठी उपलब्ध असणार आहेत.”

“धनंजय चंद्रचूड यांची उपस्थिती आपल्या शैक्षणिक संस्थेला समृद्ध करेल. आता विद्यापीठ एक केंद्र फॉर कॉन्स्टिट्यूशनल स्टडीज स्थापन करेल. त्या ठिकाणी धनंजय चंद्रचूड हे संशोधन कार्याचे नेतृत्व करतील”, असं कुलगुरू जी एस बाजपेयी यांनी म्हटलं आहे. दरम्यान, एनएलयू विद्यापीठ जुलै २०२५ पासून इन द स्पिरिट ऑफ जस्टिस, द डीवायसी डिस्टिंग्विश्ड लेक्चर सिरीज नावाची व्याख्यानमाला सुरू करण्याची योजना आखत आहे.

ही मालिका धनंजय चंद्रचूड यांनी लिहिलेल्या प्रमुख निर्णयांवर लक्ष केंद्रित करेल. ज्यामध्ये गोपनीयता, एलजीबीटीक्यू अधिकार, लिंग न्याय, डिजिटल स्वातंत्र्य आणि न्यायिक सुधारणा यासह आदी महत्वांच्या विषयांचा समावेश असेल. त्यांच्या दृष्टिकोनातून यावर चर्चा केली जाईल असं वृत्तात म्हटलं आहे.

दरम्यान, भारताचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून दोन वर्षे काम केल्यानंतर धनंजय चंद्रचूड नोव्हेंबर २०२४ मध्ये निवृत्त झाले. ते १३ मे २०१६ रोजी सर्वोच्च न्यायालयात रुजू झाले होते. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात काही महत्त्वाच्या प्रकरणांचा निर्णय दिला. काही महत्वाच्या निर्णयांमध्ये देखील त्यांचा सहभाग होता. अयोध्या जमीन वाद प्रकरण, गोपनीयतेच्या अधिकारावरील निर्णय, समलिंगी संबंधांना गुन्हेगारीमुक्त करणे आणि कलम ३७० वरील निर्णय अशा काही निर्णयांचा समावेश होता.

सर्वोच्च न्यायालयात येण्यापूर्वी धनंजय चंद्रचूड यांनी २००० पासून मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम केलं होतं. त्यानंतर २०१३ मध्ये ते अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले. १९९८ मध्ये त्यांना वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त करण्यात आलं आणि न्यायाधीश होण्यापूर्वी त्यांनी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून देखील काम पाहिलं होतं.