DY Chandrachud on Technology: भारताचे माजी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड हे नोव्हेंबर २०२४ मध्ये सरन्यायाधीश पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर चंद्रचूड नेमके काय करत आहेत? त्यांच्या पुढील योजना काय आहेत? तसेच त्यांनी ‘Why the Constitution Matters’ हे पुस्तक लिहिले आहे. यानिमित्ताने द इंडियन एक्सप्रेशी संवाद साधला. या मुलाखतीमध्ये त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य, भारताचे भविष्य, जेनझीच्या अपेक्षा आणि इतर अनेक महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केले.
या मुलाखतीमध्ये त्यांनी ‘राईट टू प्रायव्हसी’च्या निर्णयाबाबत मनोगत व्यक्त केले. आज गोपनियता हा मूलभूत अधिकार मिळाला असल्याचे ते म्हणाले. “गोपनियतेच्या अधिकाराची व्याप्ती आता खूप वाढली असल्याचे ते म्हणाले. तुमचे बेडरूम ते डिजिटल डिव्हाईसपर्यंत गोपनियतेचा विस्तार झाला आहे. त्यामुळे भविष्यात आपल्यासमोर गोपनियता राखण्याचे आव्हान उभे राहू शकते”, असेही ते म्हणाले.
तंत्रज्ञानाच्या प्रगतीबाबत माहिती देताना माजी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड म्हणाले, “तंत्रज्ञान जितक्या वेगाने बदलत आहे, तितक्या वेगाने कायदा बदलत नाही. प्रसंगी कायदा हा तंत्रज्ञानाच्या मागे राहतो. एआय आणि क्वांटम कम्प्युटिंगच्या काळात तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. अशावेळी कायद्याचे त्यावर नियंत्रण कसे असेल? हे अधिक महत्त्वाचे ठरेल. आज तंत्रज्ञान इतके विस्तारले आहे की, मी जर घरापासून कुठे बाहेर पडलो तर कुठे गेलो, कुठे खायला थांबलो, या सर्व गोष्टी डिजिटली रेकॉर्ड होत असतात.”
इच्छा असूनही स्मार्टवॉट नाही घेतले
“तुम्ही आज पुस्तक ऑनलाईन विकत घेता. जेवण ऑनलाईन मागवता. ऑनलाईन संगीत ऐकता. आपल्या वैयक्तिक आयुष्याशी सर्व घटना डिजिटली होत असून त्याची नोंद होत आहे. त्यामुळेच मी इच्छा असूनही स्मार्टवॉच विकत घेतले नाही. खरंतर स्मार्टवॉचचा फायदाही होता. तुम्ही किती चालला? ही माहिती मिळत आहे. पण तरी मला वाटले की, आपण इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या खूपच अधीन होत आहोत. त्यामुळे ते घेणे मी टाळले.”
डीवाय चंद्रचूड यांनी या मुलाखतीमध्ये लहानपणीच्या आठवणीही जागवल्या. त्यांचे वडील माजी सरन्यायाधीश यशवंत चंद्रचूड हे पुण्याहून मुंबईत आल्यानंतर चाळीत राहत होते. सातवीपर्यंत ते मराठी शाळेत शिकले. मुंबईत आल्यानंतर आम्हाला वडिलांनी इंग्रजी शाळेत शिकवलं. आम्ही घरात मराठी बोलायचो. लहानपणी आम्ही मध्यमवर्गीय आयुष्य जगलो. या काळात आई-वडिलांनी उत्तम संस्कार केले अशी आठवण डीवाय चंद्रचूड यांनी सांगितली.