Former French President Nicolas Sarkozy 5-years prison sentence : फ्रान्सच्या इतिहासात आजचा दिवस दीर्घकाळ लक्षात राहील. कारण माजी फ्रेंच अध्यक्ष निकोलस सार्कोझी यांना पाच वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली असून आज त्यांच्या शिक्षेचा पहिला दिवस आहे. आज त्यांची तुरुंगात रवानगी झाली. पाच वर्षांसाठी तुरुंगवासात जाणारे ते फ्रेंच इतिहासातील पहिले प्रमुख नेते ठरले आहेत.
निकोलस सार्कोझी यांच्यावर २००७ च्या अध्यक्षीय निवडणुकीवेळी प्रचार करण्यासाठी लिबियाहून अवैधपणे निधी मिळवल्याचा व तो निवडणूक जिंकण्यासाठी वापरल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. सार्कोझी यांनी लिबियाचे हुकुमशाह मुअम्मर अल-गद्दाफी यांच्याकडून निधी घेतल्याचा आरोप आहे. याप्रकरणी त्यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली असून ते मंगळवारी पॅरिसमधील ला सांते तुरुंगात दाखल झाले.
एक लाख युरोंचा दंड
सार्कोझी हे आधुनिक फ्रान्समधील पहिले असे नेते आहेत ज्यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी न्यायालयाने सार्कोझी यांना एक लाख युरोचा दंडही ठोठावला आहे. सार्कोझी यांना ला सांते येथील तुरुंगामधील एका विशेष विभागात (ज्याला बोलीभाषेत व्हीआयपी विभाग म्हटलं जातं) ठेवलं जाणार आहे. येथे पूर्वी हाय-प्रोफाइल कैद्यांना ठेवलं जात होतं. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना इतर कैद्यांपासून दर एकांतात ठेवलं जाणार आहे.
मंगळवारी सकाळी निकोलस सार्कोझी हे त्यांच्या पत्नीबरोबर घराबाहेर पडले आणि थेट ला सांते तुरुंगात गेले. तत्पूर्वी त्यांनी समाजमाध्यमांवर एक पोस्ट लिहिली आहे. यात म्हटलं आहे की “एका निर्दोष व्यक्तीला तुरुंगात डांबलं जात आहे.”
गद्दाफी यांच्या मुलामुळे प्रकरण आलं बाहेर
२०१३ साली हे प्रकरण प्रकाशझोतात आलं. गद्दाफी यांचा मुलगा सैफ अल-इस्लाम याने सार्कोझी यांनी त्यांच्या वडिलांकडून निवडणुकीसाठी कोट्यवधी रुपये घेतल्याचा आरोप केला होता. लेबनीज व्यापारी झियाद तकियेद्दीन यांच्याकडूनही सार्कोझी यांनी पैसे घेतल्याचा दावा केला होता. यावर अनेक वर्षे न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणीअंती न्यायालयाने सार्कोझी यांनी गद्दाफी यांच्याकडून पैसे घेऊन निवडणुकीसाठी वापरल्याचं म्हटलेलं नसलं तरी सार्कोझी यांच्यावर अवैध निवडणूक करार करण्याच्या गुन्हेगारी कटात सहभागी असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. सार्कोझी यांनी मात्र त्यांच्यावरील आरोप स्वीकारले नाहीत. सुडबुद्धीने माझ्यावर आरोप केले गेले आहेत असं सार्कोझी यांनी म्हटलं आहे.