पीटीआय, नवी दिल्ली

हरियाणाचे माजी मंत्री गोपाल गोयल कांडा यांची गीतिका शर्मा आत्महत्या प्रकरणी दिल्लीतील एका न्यायालयाने मंगळवारी निर्दोष मुक्तता केली. कांडा यांनी गीतिकाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे सिद्ध करण्यात तपास यंत्रणा अपयशी ठरल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.
कांडा यांच्या विमान कंपनीमध्ये काम करणाऱ्या गीतिकाने ५ ऑगस्ट २०१२ रोजी आत्महत्या केली. तब्बल ११ वर्षांनंतर दिल्लीच्या रोस अव्हेन्यू न्यायालयाचे विशेष न्यायाधीश विकास धूल यांनी कांडा यांच्यासह सहआरोपी अरूणा चड्ढा यांचीही मुक्तता केली. पोलिसांनी या निर्णयाला आव्हान देण्याचा निर्णय घेतल्यास दोघांनीही सुनावणीसाठी हजर रहावे, यासाठी जामीन म्हणून प्रत्येकी १ लाख रुपये जमा करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. आत्महत्येच्या आदल्या दिवशी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये गीतिकाने कांडा व चड्ढा यांनी छळ केल्याचा आरोप केला होता. मात्र हे आरोप तपासामध्ये सिद्ध होऊ शकले नाहीत, असे न्यायालयाने आपल्या १८९ पानी निकालपत्रात म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपचे ‘आमंत्रण’

निर्दोष मुक्तता झाल्यानंतर अवघ्या काही तासांत हरियाणातील सिरसाचे आमदार गोपाल कांडा यांना भाजपने आमंत्रित केले आहे. हरियाणा भाजपचे मुख्य प्रवक्ते संजय शर्मा म्हणाले, की कांडा हे ‘रालोआ’चा भाग आहेत. अलिकडेच झालेल्या बैठकीसाठीही त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र त्यांनी आपला बंधू गोविंद यांना पाठविले. अपक्ष आमदार म्हणून ते कोणत्याही पक्षात जाण्यास मोकळे असले तरी त्यांना भाजपमध्ये यायचे असेल, तर त्यांचे स्वागत आहे, असे शर्मा म्हणाले.