scorecardresearch

मोठी बातमी! मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना ४ दिवसांची सीबीआय कोठडी

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना चार दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे.

मोठी बातमी! मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना ४ दिवसांची सीबीआय कोठडी
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे (फोटो- एएनआय)

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना केंद्रीय अन्वेषण ब्युरो अर्थात सीबीआयने अटक केली आहे. संजय पांडे मागील काही दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत होते. राष्ट्रीय शेअर बाजार को- लोकेशन घोटाळा आणि बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणात ईडीने त्यांना अटक केली होती. आज त्यांना दिल्ली न्यायालयात हजर करण्यात केलं असता न्यायालयाने त्यांना ४ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.

कथित को-लोकेशन घोटाळा आणि बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणी सीबीआय आणि ईडीकडून समांतर तपास सुरू आहे. याप्रकरणी ईडीने यापूर्वीच संजय पांडेंना अटक केली होती. यानंतर आता सीबीआयने संजय पांडेंना अटक केली आहे. पुढील चार दिवस संजय पांडे सीबीआय कोठडीत राहणार आहेत.

को-लोकेशन घोटाळा नेमका काय आहे?

या सेवेअंतर्गत राष्ट्रीय शेअर बाजारातील दलाल कंपन्यांना आपलं सर्व्हर शेअर बाजार परिसरात उभारण्याची परवानगी दिली जाते. यामुळे ब्रोकर्स शेअर बाजारात सुरू असलेल्या हालचाली सर्वात आधी आणि वेगाने मिळवू शकतात, याचा फायदा दलालांना होतो. अशा प्रकारे अनेक ब्रोकर्संनी बेकायदेशीरपणे कोट्यवधी रुपये कमावल्याचं तपासात समोर आलं होतं. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या अल्गोरिदममध्येही छेडछाड झाल्याचं तपासात उघड झालं. याप्रकरणी राष्ट्रीय शेअर बाजाराच्या माजी प्रमुख चित्रा रामकृष्णन यांना गेल्या महिन्यात ईडीने अटक केली होती. या प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांचाही समावेश असल्याचा दावा तपास यंत्रणांकडून करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या