अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर रविवारी (१४ जुलै) पेनसिल्व्हेनियातील बटलर या ठिकाणी एका रॅली दरम्यान जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. मात्र, या हल्ल्यातून डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले. त्यांच्या उजव्या कानाच्या वरच्या भागाला गोळी चाटून गेली. या हल्ल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. यानंतर या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यादरम्यान एका महिलेच्या संशयास्पद हालचालीचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या महिलेच्या हालचाली संशयास्पद असल्याचं म्हटलं आहे. कारण डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ज्यावेळी गोळीबार झाला त्यावेळी ती महिला एकदम शांत असल्याचं दिसत आहे. तसेच घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटिझन्सनी म्हटलं आहे की ती महिला “शूटरच्या दिशेने” पाहत आहे. तसेच गोळीबार होताना त्या महिलेने कोणताही धक्का व्यक्त केला नाही. एवढंच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार होत असताना ती सर्व घटना मोबाईलमध्ये रेकॉर्ड करतानाही दिसली. त्यामुळे या हल्ल्याचं गूढ वाढलं आहे.
हेही वाचा : अधिवेशनात जंगी स्वागत, ट्रम्प यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; व्हान्स उपाध्यक्षपदाचे उमेदवार
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प भाषण करत असताना त्यांच्यापाठीमागे पांढरा पोशाख परिधान केलेली आणि काळा सनग्लास घातलेली ही महिला मागे उभी असल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे. गोळीबार होण्याच्या काही क्षण आधी आणि त्यानंतर या महिलेच्या हालचाली संशयास्पद असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. व्हायरल व्हिडीओवर नेटिझन्सने या महिलेच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे. तसेच गोळीबाराच्या घटनेवेळी गोळीबाराच्या आवाजाचा कोणताही धक्का या महिलेला बसला नाही, असंही नेटिझन्सनी म्हटलं आहे.
नेमकं काय घडलं होतं?
डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेतील पेनासेल्वेनिया या ठिकाणी रविवारी (१४ जुलै) ट्रूथ सोशल प्लॅटफॉर्मवर बोलत होते. त्याचवेळी त्यांच्यावर गोळीबार झाला. ही गोळी त्यांच्या कानाला चाटून गेली. अशात तातडीने ट्रम्प हे खाली वाकले. त्यानंतर सिक्रेट सर्व्हिसचे सुरक्षा रक्षक त्यांच्या भोवती आले. त्यांच्या भोवती कडं तयार करुन त्यांना या ठिकाणाहून बाजूला करण्यात आलं. त्यानंतर जो हल्लेखोर होता त्यालाही ठार करण्यात आलं. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ट्रम्प यांनी त्याबाबत संवेदना व्यक्त केली होती.
दरम्यान, घटनेनंतर रिपब्लिक पक्षाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं होतं की, आम्ही या घटनेची चौकशी करत आहोत. ट्रम्प यांची सभा असताना इमारतीच्या छतावर तो हल्लेखोर पोहचलाच कसा? याचा तपासही आम्ही करत आहोत. रॉयटर्सच्या वृत्तानुसार हल्लेखोराने एकाहून अधिक राऊंड फायर केले. डोनाल्ड ट्रम्प हे या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. यानंतर सिक्रेट सर्व्हिसच्या सुरक्षा रक्षकांसह डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षा व्यवस्थेत आणखी वाढ करण्यात आली आहे.