पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे प्रमुख सी. रंगराजन यांनी गुरुवारी संभाव्य डिझेल दरवाढीचे समर्थन केले. ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ फॉरेन ट्रेड’ने येथे आयोजित केलेल्या एका परिसंवादात ते बोलत होते.
देशात सध्या डिझेलच्या मागणीत कमालीची वाढ होत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाची किंमत आणि आपल्याकडे असणारा डिझेलचा दर यात ताळमेळ नाही. सरकारतर्फे डिझेलवर सवलत देण्यात येत असल्याने ही तफावत वाढतच आहे, वाढती वित्तीय तूट कमी करण्यासाठी डिझेलच्या दरांबाबत सरकारला काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल, असे सूचक उद्गार त्यांनी काढले. डिझेलचे दर कधी वाढवायचे हे मात्र सर्वस्वी सरकारच्या हातात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
वाढता महागाई दर आणि वाढती वित्तीय तूट ही सरकारपुढील डोकेदुखी असून डिझेलच्या दरांत योग्य वाढ केल्यास या दोन्ही गोष्टी आटोक्यात येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, रेल्वेच्या तिकीटाच्या भाडय़ात झालेल्या वाढीचे केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री मनीष तिवारी यांनी ट्विटरवरुन समर्थन केले.