केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या तब्येतीविषयी सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्या चौघांना गुजरातमध्ये अटक करण्यात आली आहे. दोन व्यक्तींना भावनगर तर दोन व्यक्तींना अहमदाबादमधून अटक करण्यात आली आहे. India Today ने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे. सोशल मीडियावर अमित शाह यांच्या तब्येतीविषयी गेल्या काही दिवसांत चुकीची माहिती पसरवण्यात येत होती. अखेरीस अमित शाह यांनी स्वतः स्पष्टीकरण देत आपली तब्येत ठणठणीत असल्याचं जाहीर केलं.

काय म्हणाले अमित शाह??

“मागील काही दिवसांपासून काही मित्रांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्या आरोग्यासंदर्भात वाटेल त्या अफवा पसरवल्या. काही लोकांनी तर माझा मृत्यू व्हावा म्हणून ट्विट करुन प्रार्थनाही केली.

देश सध्या करोनासारख्या जागतिक महारोगाशी लढा देत आहे. देशाचा गृहमंत्री म्हणून मी रात्रंदिवस माझ्या कामात व्यस्त असल्याने मी या गोष्टींकडे फारसे लक्ष दिलं नाही. जेव्हा ही गोष्ट माझ्या लक्षात आणून दिली तेव्हा मी विचार केला की हे सर्व लोक त्यांच्या काल्पनिक जगात जगत आहेत. त्यामुळेच मी कोणतेही स्पष्टीकरण दिले आहे.

मात्र माझ्या पक्षाच्या लाखो कार्यकर्त्यांमुळे आणि माझ्या शुभचिंतकांमध्ये मागील दोन दिवसापासून यासंदर्भात चिंता व्यक्त केली जात होती. त्यांच्या चिंतेकडे मी कानाडोळा करु शकत नाही. त्यामुळेच मी आज हे स्पष्ट करु इच्छितो की मी पूर्णपणे बरा आहे मला कोणताही आजार झालेला नाही.

हिंदू धर्मातील मान्यतेनुसार असं मानलं जातं की अशाप्रकारची अफवा पसरवल्यास व्यक्ती अधिक मजबूत होते. त्यामुळे मी अशा सर्व लोकांकडून अपेक्षा करतो की त्यांनी या व्यर्थ गोष्टी करु नयेत आणि मला माझे काम करु द्यावे तसेच त्यांनी स्वत:चे काम करावे.

माझ्या तब्बेतीबद्दल चिंता करणाऱ्या आणि विचारपूस करणाऱ्या माझ्या सर्व शुभचिंतकांचे आणि कार्यकर्त्याचे आभार मानतो.

ज्या लोकांनी ही अफवा पसरवली आहे त्या लोकांविरोधात माझ्या मनात कोणताही राग नाही

– अमित शाह

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाह यांच्या तब्बेतीसंदर्भात सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या अफवांसंदर्भात एप्रिल महिन्यामध्येही सकरकारच्या पत्रसूचना विभागालाच (पीआयबी) ट्विटवरुन खुलासा केला होता. “एका हिंदी वृत्तवाहिनीच्या नावाने मॉर्फ (छेडछाड आणि बदल) केलेला एक फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होता आहे. या फोटोमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना करोनाची लागण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र हा फोटो खोटा असून गोंधळ निर्माण करण्याच्या हेतूने तो व्हायरल केला जात आहे. कृपया हा फोटो शेअर आणि फॉर्वर्ड करु नका,” असं आवाहन पीआयबीने केलं होतं.