काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वारानजीक अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या आत्मघाती कार बॉम्बस्फोटात ४ ठार तर इतर १५ जण जखमी झाले आहे असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दुपारच्या सुमारास हा स्फोट झाल्यानंतर काळ्या धुराचे लोट सगळीकडे दिसत होते. शुक्रवारी काबूलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये ५१ जण ठार झाले होते.
पोलिस, सैनिक, रुग्णवाहिका घटनास्थळी गेले. सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते वाहिदुल्लाह मायर यांनी सांगितले, की घटनास्थळी चार मृतदेह सापडले असून जखमींमध्ये एक मूल व एका महिलेचा समावेश आहे. पोलिस उपप्रमुख जनरल गुल आगा रोहानी यांनी सांगितले, की आत्मघाती कारबॉम्बचा स्फोट विमानतळाच्या प्रवेशद्वारासमोर झाला व आपण घटनास्थळी भेट देण्यास निघालो आहोत. स्फोटानंतर मोटारीचे अवशेष दिसत होते. जवळपासची दुकाने उद्ध्वस्त झाली असून एका मंगल कार्यालयाच्या खिडक्या फुटल्या आहेत असे प्रत्यक्ष घटना पाहणाऱ्यांनी सांगितले. विमानतळाच्या प्रवेशद्वारावर वाहतुकीची कोंडी झाली होती, कारण वाहनांची प्रत्येक नाक्यावर तपासणी सुरू होती. काबूलमध्ये परवापासून अनेक बॉम्बस्फोट झाले असून त्यात शेकडो लोकांचे बळी गेले आहेत. तालिबानचा नेता मुल्ला महंमद ओमर ठार झाल्याचे समजल्यानंतर तालिबानच्या हल्ल्यांची तीव्रता वाढली आहे. त्याच्या मृत्यूच्या बातमीला तालिबानने दुजोरा दिला असून त्यांच्यात नेतेपदावरून अंतर्गत वाद सुरू झाले, त्यामुळे तालिबानला दिशा राहिली नाही.
संग्रहित लेख, दिनांक 11th Aug 2015 रोजी प्रकाशित
काबूल विमानतळाजवळ बॉम्बस्फोटात अफगाणिस्तानात ४ ठार; १५ जखमी
काबूलमधील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वाराजवळ सोमवारी दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती कार बॉम्बस्फोटात चार जण ठार तर १५ जण जखमी झाले.

First published on: 11-08-2015 at 01:05 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four dead in an explosion near kabul airport