गेल्या १५ वर्षांपासून अफगाणिस्तानचे तालिबानसोबत सुरू असलेले युद्ध संपवण्याच्या उद्देशाने आराखडा तयार करण्यासाठी बोलण्याच्या दुसऱ्या फेरीसाठी चार देशांचे प्रतिनिधी सोमवारी कडक सुरक्षा व्यवस्थेत एकत्र आले.
यापूर्वी बोलण्याची पहिली फेरी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये झाली होती. त्याच्या एका आठवडय़ानंतर अफगाणिस्तान, पाकिस्तान, चीन व अमेरिका या देशांचे वरिष्ठ अधिकारी काबूलमध्ये एका दिवसाकरता भेटत आहेत, असे अफगाण परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते शेकिब मोस्ताघनी यांनी सांगितले.
काबूलच्या मध्यभागी असलेल्या अध्यक्षीय प्रासादात बैठकीची सुरुवात करताना अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री सलाहुद्दीन रब्बानी यांनी तालिबानला संवादातून शांततेबाबत सरकारच्या प्रस्तावाला प्रतिसाद देण्याचे आवाहन केले. अफगाणिस्तानात दरवर्षी घडणाऱ्या क्रूर आणि प्राणघातक दहशतवादाच्या तडाख्यातून देशातील एकही कुटुंब सुटलेले नाही, असे त्यांनी दूरचित्रवाहिनीवरून प्रक्षेपित झालेल्या भाषणात सांगितले. तालिबानच्या सर्व गटांनी आमचे संवादाच्या माध्यमातून शांततेचा प्रस्ताव स्वीकारून चर्चेत सहभागी व्हावे, जेणेकरून आम्ही सर्व मतभेद सोडवू शकू आणि अफगाणी जनतेची शांततेची इच्छा पूर्ण करू शकू, असे भावनिक आवाहन रब्बानी यांनी केले. तालिबानच्या प्रतिनिधींचा समावेश नसलेली ही बैठक म्हणजे तीन टप्प्यांच्या शांतता प्रक्रियेचा भाग आहे, असे अफगाणिस्तानातील युद्ध संपुष्टात आणण्यासाठी माजी अध्यक्ष हमीद करझाई यांनी स्थापन केलेल्या ‘काबूल हाय पीस कौन्सिल’चे अब्दुल हकीम मुजाहिद यांनी सांगितले.