scorecardresearch

चार दहशतवाद्यांना हरियाणात स्फोटकांसह अटक; महाराष्ट्र आणि तेलंगणात घातपाताच्या तयारीचा संशय

पंजाबची दहशतवादी संघटना बब्बर खालसा इंटरनॅशनलशी संबंधित असलेला हरविंदरसिंग रिंदा याच्यासाठी काम करणाऱ्या चार संशयित दहशतवाद्यांना हरियाणा पोलिसांनी फिरोजपूर आणि लुधियाना येथून अटक केली.

नांदेड, चंडीगड : पंजाबची दहशतवादी संघटना बब्बर खालसा इंटरनॅशनलशी संबंधित असलेला हरविंदरसिंग रिंदा याच्यासाठी काम करणाऱ्या चार संशयित दहशतवाद्यांना हरियाणा पोलिसांनी फिरोजपूर आणि लुधियाना येथून अटक केली. हे दहशतवादी महाराष्ट्रातील नांदेड आणि तेलंगणातील आदिलाबाद येथे ही स्फोटके पोहचवणार होते, असे सूत्रांनी सांगितले.

त्यांच्याकडून मोठा शस्त्रसाठा जप्त केला असल्याची माहिती प्रसारमाध्यमांना करनालचे पोलीस अधीक्षक गंगाराम पुनिया यांनी दिली. यामुळे नांदेडमध्ये खळबळ आणि भीतीचे वातवरण निर्माण झाले आहे. नांदेडचा संबंध थेट दहशतवादी कारवायाशी जोडला गेल्याचे आता पुढे येऊ लागले आहे.

लुधियाना येथील भूपिंदर सिंग आणि फिरोझपूर येथील गुरप्रीत सिंग, परिमदर सिंग व अमनदीप सिंग हे चौघे स्फोटकांची खेप पोहोचवण्यासाठी तेलंगणातील आदिलाबाद येथे निघाले होते. दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या पाकिस्तानातील हरविंदरसिंग रिंडा याच्याशी ते संपर्कात होते. रिंडा हा ड्रोन्सच्या मदतीने फिरोझपूरमधील शेतांत आधीच ठरवलेल्या ठिकाणी शस्त्रे व स्फोटके टाकत होता, अशी माहिती पुनिया यांनी पत्रकारांना दिली.

नांदेड शहरात गेल्या काही वर्षांपासून हरविंदरसिंग रिंदा या कुख्यात गुन्हेगाराची मोठय़ा प्रमाणात दहशत आहे. त्यांनी यापूर्वी अनेक व्यापाऱ्यांना खंडणीसाठी धमक्या सुद्धा दिल्या आहेत. एवढेच नाही तर बंदुकीतून गोळया झाडून दोन जणांचा खून करुन तो नांदेडहून पसार झाला आहे. हरविंदरसिंग रिंदा हा सध्या पाकिस्तानमध्ये असल्याचे पोलिस अधीक्षक पुनिया यांनी सांगितले. गाडीमध्ये एक देशी पिस्तूल, ३१ जिवंत काडतुसे, तीन अडीच किलो वजनाच्या लोखंडी कंटेनर असा शस्त्रसाठा जप्त केला. हे चारही जण नांदेडमध्ये मोठी कारवाई करण्याच्या उद्देशाने पाकिस्तानमध्ये दबा धरुन बसलेला हरविंदरसिंग रिंदा याच्या सांगण्यावरून नांदेडकडे येत असल्याचे पोलिस अधीक्षक गंगाराम पुनिया यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. या घटनेमुळे नांदेड पोलीस सतर्क झाले तर दुसरीकडे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

कारवाईत काय उघड?

दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेल्या आणि स्फोटके व शस्त्रे पोहोचवण्यासाठी एका अ‍ॅपच्या मदतीने लोकेशन्स पाठवणाऱ्या पाकिस्तानातील एका व्यक्तीच्या हे चौघे संपर्कात होते, असे समोर आले  आहे.  केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हरियाणा व पंजाब पोलिसांनी राबवलेल्या एका संयुक्त मोहिमेत ही कारवाई झाली.

हरविंदरसिंग रिंदा कोण?

कुख्यात गुन्हेगार हरविंदरसिंग रिंदा याच्यावर नांदेड शहरातील इतवारा, वजिराबाद, विमानतळ पोलीस ठाण्यात खून, दरोडा, खंडणी, खुनाचा प्रयत्न आदी कलमान्वये गंभीर गुन्हे दाखल आहेत. विमानतळ आणि वजिराबाद ठाण्यांतर्गत त्याच्यावर दोन खुनाचे गुन्हे दाखल आहेत. त्याने येथील व्यावसायिक, डॉक्टर्स, हॉटेल चालक यांच्याकडून खंडणी वसूल केल्याचेही गुन्हे दाखल झाले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Four terrorists arrested explosives haryana suspicion assassination maharashtra telangana ysh

ताज्या बातम्या