जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात शनिवारी रात्री भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत चार दहशतवादी मारले गेले असून दोन जवान शहीद झाले असल्याची माहिती सैन्यातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी मोदेरगाम गावात पहिली चकमक झाली. त्यानंतर सायंकाळी फ्रिसल या गावी दुसरी चकमक झाली. पहिल्या चकमकीत भारतीय जवानांना गंभीर जखम झाल्याचे सांगण्यात येते. शहिदांमध्ये अकोला जिल्ह्यातील २४ वर्षीय जवान प्रवीण जंजाळ यांचाही समावेश असल्याचे सांगितले जाते.

शोधमोहिम सुरू असताना सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवादी आमनेसामने आल्यानंतर चकमक सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही गावात दहशतवादी घरांमध्ये लपून बसले होते. तिथूनच ते गोळीबार करत होते. एका चकमकीत सुरक्षा दलाने संबंधित घराला स्फोटकांनी उडवून दिले. ज्यात दहशतवाद्यांचा खात्मा झाला.

काश्मीरचे पोलीस महासंचालक व्ही. के. बिर्डी यांनी सांगितले की, चारही दहशतवाद्यांचे मृतदेह आमच्या ताब्यात आहेत. मात्र इतर माहिती मोहीम संपल्यानंतर दिली जाईल. सध्यातरी ही चकमक चालू आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अकोल्यातील जवान शहीद

दहशतवाद्यांशी लढताना अकोला जिल्ह्याच्या प्रवीण जंजाळ या २४ वर्षीय जवानाला वीरमरण आल्याची माहिती मिळत आहे. ही बातमी मिळाल्यानंतर जंजाळ यांच्या मोरगाव भाकरे या गावावर शोककळा पसरली. प्रवीण जंजाळ २०१९ साली सैन्य दलात भरती झाल्याचे सांगितले जाते. मागच्याच वर्षी त्यांचे लग्न झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, मोठा भाऊ असा परिवार आहे.