‘Freedom 251’ या स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन खरेदी करण्यासाठीच्या नोंदणीला पुन्हा एकदा सुरूवात झाली आहे. अवघ्या २५१ रुपयांमध्ये मिळणाऱ्या स्मार्टफोनची नोंदणी करण्यासाठी गुरुवारी सकाळपासून भारतीयांनी कंपनीच्या संकेतस्थळावर एकच गर्दी केली होती. परिणामी कंपनीचे संकेतस्थळ क्रॅश झाले होते. यावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती, तर काहींनी हा फोन म्हणजे मोठा घोटाळा असल्याचा आरोप प्रस्थापित कंपन्यांकडून होत असून तशा आशयाचे संदेश समाज माध्यमांवर व्हायरल झाले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी या फोनसाठीची नोंदणी कंपनीकडून पुन्हा एकदा सुरू करण्यात आली असून, तुमचे नाव रजिस्टर झाल्यानंतर पुढील ४८ तासांत ई-मेलवर येणाऱया लिंकद्वारे ऑनलाईन पैसे भरावे लागणार आहेत. तसा संदेश नाव रजिस्टर झाल्यानंतर कंपनीच्या संकेतस्थळावर सध्या दाखवला जात आहे. दरम्यान, फ्रीडम २५१ च्या संकेतस्थळावर नोंदणी करण्यासाठी अद्यापही काही अडचणी येत असल्याच्या प्रतिक्रिया नेटिझन्स ट्विटरवर व्यक्त करत आहेत.

नोंदणी कशी कराल-

१. freedom251.com  या संकेतस्थळावर जाऊन ‘फ्रीडम-२५१’ स्मार्टफोन खरेदी करण्यासाठीच्या ‘BUY NOW’ पर्यायावर क्लिक करा.

२. तुमच्या संदर्भातील विचारण्यात आलेली संपूर्ण माहिती भरुन ‘ORDER NOW’ वर क्लिक करा.

३. त्यानंतर तुमची नोंदणी यशस्वीरित्या स्विकारली गेल्याचा संदेश झळकेल. तुम्ही नोंदविलेला पत्ता आणि नोंदणी क्रमांक नमूद करून ठेवा.

टीप- एका वेळी केवळ एकच मोबईल खरेदी करता येणार असून, संकेतस्थळ संपूर्ण लोड होत नसल्यास ते लोड होईपर्यंत रिफ्रेश करत राहा.

कसा आहे २५१ रुपयांचा स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन..जाणून घ्या खास फिचर्स