पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये सुरु असलेला संघर्ष हा काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. पाकिस्तानने बुधवारी अफगाणिस्तानवर एअर स्ट्राईक केला असून यावेळी पाकिस्तानने कंदाहार हे त्यांचं टार्गेट ठेवलं आहे. या हवाई हल्ल्यात अनेक लोक ठार झाल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. पाकिस्तानच्या या हवाई हल्ल्यात अनेक तालिबानी सैनिक मारले गेले आहेत असा दावा करण्यात आला आहे. द डॉनने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
पाकिस्तानला अफगाणिस्तानने उत्तर देत त्यांचे सैनिक मारल्याचा केला दावा
पाकिस्तानच्या वायुदलाने अफगाणिस्तानच्या काबूल या ठिकाणीही हल्ला केल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र तालिबानने हे वृत्त फेटाळलं आहे. एका तेलाच्या टँकरला आग लागल्याचे व्हिडीओ व्हायरल होत असल्याचं तालिबानने मह्टलं आहे. दरम्यान पाकिस्तानने जो एअर स्ट्राईक केला त्याला आम्ही प्रत्युत्तर दिलं आणि पाकिस्तानचे सैनिकही मारले असंही अफगाणिस्तानच्या वतीने सांगण्यात आलं आहे. तसंच त्यांच्या काही चौक्या आणि टँक्स आम्ही ताब्यात घेतले आहेत असाही दावा तालिबानने केला.
दोन्ही देशांचे दावे काय आहेत?
अफगाणिस्तानच्या आमज न्यूज या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी कथित हल्ला केला. तैमानी भागात स्फोटांचे आवाज आले. तालिबानचे प्रवक्ते जबिउल्लाह यांनी काबूलमध्ये हल्ला झाल्याचं वृत्त मात्र नाकारलं आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातली हिंसा थांबताना दिसत नाहीये. पाकिस्तानी सैनिकांनी स्पिन बोल्डक या ठिकाणी हल्ला केला तिथे १२ जण ठार झाले आणि १०० हून अधिक जण जखमी झाले. दरम्यान अफगाणिस्तानच्या सैन्यानेही पाकिस्तानला उत्तर दिल्याचं अफगाणिस्तानच्या प्रवक्त्याने सांगितलं. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्या तणाव का?
ऑगस्ट २०२१मध्ये अफगाणिस्तानवर पुन्हा एकदा तालिबानची सत्ता आल्यानंतर दोन्ही देशांदरम्यान उफाळून आलेला हा सर्वांत तीव्र संघर्ष ठरला. विशेषतः ११ आणि १२ ऑक्टोबर या काळात डुरँड सीमेवर अनेक ठिकाणी परिस्थिती हाताबाहेर गेली. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यादरम्यानची ही २६०० किलोमीटर लांबीची सीमारेषा दोन्ही देशांना मान्य नाही. सीमेच्या रेखांकनावरून वाद वारंवार होत असतात. पाकिस्तानमध्ये प्रशिक्षित तालिबान संघटनेने पहिल्यांदा अफगाणिस्तानचा ताबा घेतला तेव्हा, म्हणजे १९९०च्या दशकात हे वाद कमी झाले होते. पण तालिबान २.० पाकिस्तानी सरकारला तितके जुमानत नाहीत. अफगाणिस्तानात आश्रयास असलेली टीटीपी ही संघटना पाकिस्तान सरकारविरुद्ध वारंवार हल्ले करत असते. या संघटनेचे पाकिस्तान सरकार किंवा तेथील सरकारच्या आश्रयास असलेल्या विविध जिहादी संघटनांशी वाकडे आहे. पाकिस्तानातील पख्तुन प्रांतासह विशाल पख्तुनिस्तान बनवण्याचा तालिबान सरकारचा कट आहे असही पाकिस्तान सरकार आणि लष्कराला वाटते. यंदाच्या वर्षी जवळपास ८० हजार अफगाण निर्वासितांची पाकिस्तानने अफगाणिस्तानात पाठवणी केली. यामुळेही दोन्ही देशांमध्ये विलक्षण कटुता निर्माण झाली.