ई-कॉमर्स साईटवर एखाद्या वस्तूची किंवा खाद्य पदार्थाची ऑर्डर दिल्यानंतर उद्या ड्रोनद्वारे घरपोच डिलिव्हरी मिळाल्यास आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण सोमवारीच केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाने ड्रोनच्या वापरासंदर्भातील धोरण जाहीर केले आहे. ड्रोनचा व्यावसायिक वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे. आजच्या घडीला डिलीव्हरी वेहिकल सर्विसेस व टॅक्सी आदींना सध्या ड्रोन वापरण्यास मंजुरी नसली तरी, सरकारने तसा विशिष्ट प्रस्ताव आल्यास परवानगीचा विचार होऊ शकतो असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे रिटेल क्षेत्रातल्या बड्या कंपन्यांनी त्यांची ड्रोनसेवा कशी उपयुक्त आहे आणि ती भारतीय कायद्यांच्या कक्षेत असल्याचे सिद्ध केले तर नजीकच्या काळात वस्तूंची डिलिव्हरी ड्रोनद्वारे होऊ शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजच्या घडीला ड्रोन वापरांसदर्भात कसलेच नियम नाहीत. ही त्रुटी भरून काढताना केंद्र सरकारने धोरण जाहीर केले असून येत्या १ डिसेंबरपासून देशभरात ड्रोनच्या उड्डाणाला कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे. पण त्याचसोबत काही अटी सुद्धा घालण्यात आल्या आहेत. ड्रोनचा सुरळीत वापर सुरु राहिल्यास त्या अटींमधून दिलासाही मिळू शकतो असे सरकारमधील सूत्रांनी सांगितले. वजनानुसार ड्रोनची पाच विभागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. सर्वात छोटो नॅनो ड्रोन ज्याचे वजन २५० ग्रॅम असेल. सर्वात वजनदार १५० किलोचे ड्रोन असेल.

नॅनोच्या वापरासाठी कुठल्याही परवानगीची आवश्यकता नसून ते कुणीही वापरू शकेल. फक्त त्यांना पोलिसांना याची कल्पना द्यावी लागेल. साधारणपणे लहान मुल खेळणी म्हणून अशा ड्रोनचा वापर करतात. तर त्यापेक्षा मोठ्या ड्रोनसाठी परवाना बंधनकारक असेल. अशा ड्रोनसाठी डिजिटल स्काय पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. त्यांना यूआयएन नंबर दिला जाईल. ज्यांना कोणाला अशा ड्रोनचे परवाने हवे असतील त्यांची वयोमर्यादा १८ पेक्षा जास्त असली पाहिजे तसेच दहावीपर्यंतच्य शिक्षणाबरोबर त्यांना इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. ही संपूर्ण नोंदणीची प्रक्रिया मोबाईल अॅपच्या माध्यमातून होणार असून मंजुरी देणं अथवा नाकारणं या सगळ्या गोष्टी अॅपवर तात्काळ होणार आहेत.

रिमोटली पायलटेड एअरक्राफ्ट सिस्टीमच्या (आरपीएएस) वापरासाठी मानवरहीत विमान संचलन परवाना आवश्यक आहे. फक्त दिवसा प्रकाशात ४०० फूट उंचीपर्यंत तुम्ही ड्रोन उडवू शकता असे धोरणात स्पष्ट करण्यात आले आहे. विमानतळ, आंतरराष्ट्रीय सीमा, दिल्लीतला विजय चौक, राज्यातील सचिवालय, लष्करी तळ या ठिकाणी ड्रोनला नो फ्लाय झोन असेल. म्हणजे इथे ड्रोन उडवता येणार नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: From december flying drones in india legal
First published on: 28-08-2018 at 02:17 IST