Meeting of Parliamentary Standing Committee : भारत-पाकिस्तान संघर्षादरम्यान विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या विधानामुळेही विरोधकांनी प्रश्नांची सरबत्ती लावली आहे. विरोधकांच्या मनातील हा गोंधळ थांबावा याकरता काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या अध्यक्षतेखाली संसदेच्या परराष्ट्र व्यवहारांवरील स्थायी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली असून विरोधकांच्या मनातील शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न केल्याचं वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे. ही बैठक जवळपास दोन तास चालली होती.
भारत- पाकिस्तान संघर्षादरम्यान पाकिस्तानकडून अणुयुद्धाचे संकेत मिळाले होते का असा प्रश्न उपस्थित करण्यात आल होता. त्यावर परराष्ट्र मंत्र्यांनी हा संशय खोटा असल्याचं म्हटलं आहे. असे कोणतेही अणुसंकेत शेजारील राष्ट्रांकडून आले नसल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच, या दोन्ही देशांतील संघर्ष पारंपरिक क्षेत्रात झाला होता, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
दोन शत्रू राष्ट्रातील संघर्षात तिसऱ्या देशाने हस्तक्षेप केल्यानं शस्त्रविराम झाला का असा प्रश्न यावेळी परराष्ट्रसचिवांना विचारला होता. त्यावर त्यांनी म्हटलं की, दोन्ही देशांमधील शस्त्रविराम हा द्विपक्षीय निर्णय होता आणि त्यात अमेरिकेचा कोणताही हस्तक्षेप नव्हता. तसंच, २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील दहशतवादी कुठे पळून गेले, त्यांना पकडण्यासाठी सरकार काय करत आहे, असाही प्रश्न विचारण्यात आला होता.
तर परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले, ऑपरेशन सिंदूर सुरू होण्यापूर्वी भारताने पाकिस्तानला माहिती दिली नव्हती. दुसऱ्या सदस्याने जागतिक स्तरावर पाकिस्तानला एकटे पाडण्यासाठी भारत सरकार कोणती पावले उचलत आहे याबद्दल विचारले.
पाकिस्तानकडून चिनी प्लॅटफॉर्मचा वापर
एका विरोधी पक्षाच्या सदस्याने विचारले की भारत राजनैतिकदृष्ट्या एकाकी का पडला आहे? काही विरोधी सदस्यांनी असाही प्रश्न विचारला की पाकिस्तानने भारतासोबतच्या संघर्षात चिनी प्लॅटफॉर्मचा वापर केला का, यावर मिस्री यांनी उत्तर दिले की भारताने पाकिस्तानी हवाई तळांवर हल्ला केल्यामुळे काही फरक पडत नाही, असे कळते.
संसदेच्या परराष्ट्र व्यवहारांवरील स्थायी समितीच्या बैठकीला तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी, काँग्रेसचे राजीव शुक्ला आणि दीपेंद्र हुडा, एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी आणि भाजपच्या अपराजिता सारंगी आणि अरुण गोविल यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.