इंधनाचे दर हे अमेरिका ठरते त्यामुळे केंद्र सरकारला दोषी ठरवणं चुकीचं आहे, असं मत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केलं आहे. वाढत्या इंधनदरांसाठी केंद्राला दोषी ठरवणं अयोग्य असल्याचं दानवे यांनी औरंगाबादमधील एका कार्यक्रमामध्ये म्हटलं आहे.

केंद्र सरकारने याच महिन्याच्या सुरुवातीला इंधनावरील कर कमी केला होता अशी आठवण दानवे यांनी करुन दिलीय. मात्र त्याचवेळी भाजपाची सत्ता नसणाऱ्या महाराष्ट्रासारख्या अनेक राज्यांनी व्हॅट कमी केलेला करुन सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा दिलेला नाही, असंही दानवे म्हणाले आहेत. रविवारी रात्री एका कार्यक्रमामध्ये बोलताना इंधनाचे दर हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील कच्च्या तेलाच्या किंमतीनुसार ठरवले जातात असा युक्तीवाद दानवेंनी केलाय. औरंगाबादमधील भाजपाच्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटन समारंभाच्या वेळी दानवे बोलत होते. यावेळी भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.

नक्की पाहा हे फोटो >> पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी नेपाळला जातायत UP, बिहारचे लोक; पाहा नेपाळमध्ये इंधन भरल्याने किती रुपयांचा होतोय फायदा

कार्यक्रमात भाषण देताना दानवेंनी इंधनाचे वाढलेले दर आणि विरोधी पक्षांकडून त्याविरोधात होणारी आंदोलने या मुद्द्यावर भाष्य केलं. इंधनदरवाढीसाठी केंद्र सरकारला लक्ष्य करणं चुकीचं आहे, असं दानवे म्हणाले. “इंधन दरवाढीविरोधात देशामध्ये अनेक ठिकाणी आंदोलने आणि मोर्चे काढले जात आहेत. मात्र इंधनाचे दर हे जागतिक बाजारामधील परिस्थितीवर अवलंबून असतात. एखाद्या दिवशी ते ३५ पैशांने वधारतात तर दुसऱ्या दिवशी एका रुपयाने खाली येतात. पुन्हा ५० पैशांनी वधारतात. या किंमती अमेरिकेमध्ये ठरवल्या जातात. त्यामुळे केंद्र सरकारला यासाठी दोष देणं चुकीचं आहे. केंद्राने इंधनावरील कर कमी केला आहे. मात्र काँग्रेसची सत्ता असणारी राज्ये आणि विरोधी पक्षांची सत्ता असणाऱ्या राज्ये कर कपात करण्यास तयार नाहीत. देशातील कारभार हा केंद्र सरकारने दिलेल्या निधीवर चाललाय. आपण लोकांना हे सांगितलं पाहिजे,” असं दानवे यांनी भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हटलं.

नक्की वाचा >> “पेट्रोल २०० रुपये लीटर झाल्यावर बाईकवरुन ट्रीपल सीट प्रवासाला परवानगी मिळेल”; भाजपा नेत्याचं वक्तव्य

महाविकास आघाडीमधील घटक पक्षाचे नेते एकत्र येऊन चर्चा करुन निर्णय घेत नाहीत असा टोलाही दानवेंनी यावेळी लगावला.