Paras Hospital Gunmen Open Fire Patna : बिहारमधील पाटणामध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढल्याचं चित्र मागील काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. ४ जुलै रोजी व्यावसायिक गोपाल खेमका यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर शेखपुरा गावातील भाजपाचे पदाधिकारी सुरेंद्र केवट यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर बिहारमध्ये एकच खळबळ उडाली होती. या दोन्ही घटना ताज्या असतानाच आता आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे.

पाटणा येथील एका रुग्णालयात गुन्हेगारांनी अक्षरशः धुमाकूळ घातल्याची माहिती समोर आली आहे. ५ जणांच्या टोळीने हातात शस्त्र घेऊन एका रुग्णालयात जाऊन एकाची हत्या केली आहे. या संपूर्ण घटनेचा लाईव्ह थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या घटनेमुळे बिहारच्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. या घटनेमुळे बिहारमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आता १२ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

दरम्यान, काँग्रेसच्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून या घटनेचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. पाटणा येथील पारस रुग्णालयात जाऊन हल्लेखोरांनी हा गोळीबार केला. या गोळीबाराच्या घटनेनंतर काँग्रेसने नितीश कुमार सरकारवर बिहारमध्ये “गुंडशाही” ला परवानगी देण्याचा आरोप करत घणाघाती टीका केली आहे.

व्हिडीओमध्ये नेमकं काय?

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये असं दिसत आहे की चार जण शांतपणे रुग्णालयाच्या कॉरिडॉरमधून चालत येताना दिसत आहेत. त्यानंतर त्यांनी रुग्णालयातील एका खोलीचा दरवाजा उघडला आणि एका रुग्णावर अचानक गोळ्या झाडल्याचं व्हिडीओत दिसत आहे. त्यानंतर हे हल्लेखोर घटनास्थळावरून पळून जाताना दिसत आहेत. दरम्यान, या घटनेत मृत्यू झालेला चंदन मिश्रा हा बेउर तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या आरोपी होता. तो वैद्यकीय पॅरोलवर रुग्णालयात उपचार घेत होता.

आयसीयूमध्ये उपचार घेत असताना चंदन मिश्राला गोळी झाडण्यात आली. या गोळीबारात तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याच्यावर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पटना पोलिसांनी या घटनेची पुष्टी केली. तसेच प्राथमिक तपासानुसार या हत्येमागे जुने वैमनस्य असण्याची शंका पोलिसांना आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. या संदर्भातील वृत्त हिंदुस्ताान टाईम्सने दिलं आहे.

पाटणा एसएसपींनी काय सांगितलं?

घटनेबाबत एसएसपी कार्तिकेय शर्मा यांनी माहिती देताना सांगितलं की, “चंदन मिश्रा हा एक गुन्हेगार होता. त्याच्याविरुद्ध खूनाचे गुन्हे दाखल आहेत. तसेच आज झालेला हा गोळीबार कदाचित त्याच्या प्रतिस्पर्धी टोळीने केला असावा”, असं शर्मा यांनी सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तेजस्वी यादव यांची सरकारवर टीका

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी या घटनेवरून राज्य सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, “बिहारमध्ये कोणी सुरक्षित आहे का? २००५ पूर्वी बिहारमध्ये आरजेडीच्या राजवटीत अशी घटना घडली होती का?”, असं त्यांनी म्हटलं.