Gaurav Gogoi Lok Sabha Speech Against Rajnath Singh : पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर हल्ला केला होता. त्या हल्ल्यात २६ जण ठार झाले होते. त्यानंतर भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ले करून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. त्यामुळे भारत व पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू झालं होतं. मात्र, काही तासांत हे युद्ध थांबवण्यात आलं. या सर्व घटनांवर सरकारने जनतेला उत्तरं द्यावीत यासाठी विरोधकांनी अधिवेशन घेण्याची मागणी केली होती. मात्र, ही मागणी सरकारने फेटाळली. दरम्यान, सरकारने सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात यावर चर्चा करण्याची तयारी दर्शवली असून आज लोकसभेत यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या.

काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई लोकसभेत म्हणाले, “भारतीय लष्करातील अधिकारी सांगतात की पहलगाम हल्ला आणि त्यानंतरच्या भारताच्या पाकिस्तानबरोबरच्या युद्धावेळी चीन पाकिस्तानच्या पाठिशी उभा होता. परंतु, तुमच्या भाषणात चीनचा साधा उल्लेखही नव्हता. आजवर सरकारमधील कुठल्याही नेत्याने चीनचा उल्लेख केलेला नाही. लष्करी अधिकारी सांगतात की आपण ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे २१ तळ उद्ध्वस्त करणार होतो. मात्र, नंतर ठरवलं की केवळ नऊ तळांवरच हल्ले केले जातील. सरकारने असा निर्णय का घेतला. हल्ल्याची ठिकाणं कमी का केली?”

“कोणासमोर झुकलात? कोणासमोर आत्मसमर्पण केलंत?” गोगोईंचा सवाल

आसाममधील जोरहाटचे खासदार गोगोई म्हणाले, “पहलगाममधील हल्ल्यानंतर आम्ही सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्थन दिलं होतं. आपल्या आत्म्यावर हल्ला झाला होता. त्यानंतर आपण पाकिस्तानविरोधात मोहीम उघडली. त्यावेळी आपला देश वाट्टेल ती किंमत मोजायला तयार होता. सर्वजण मोदींबरोबर उभे होते. १० मे चा दिवस उजाडला. आपल्या राष्ट्रप्रमुखांनी सांगितलं की आपण पाकिस्तानवर हल्ला करू. तेच राष्ट्रप्रमुख संध्याकाळी म्हणाले, युद्धविराम झाला आहे. त्यांनी असं का केलं? ते म्हणतात पाकिस्तानने गुडघे टेकले होते, मग थांबलात का? कोणासमोर झुकलात? कोणासमोर आत्मसमर्पण केलंत?”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“ट्रम्प यांच्या दाव्यांवर मोदी गप्प का?”

गौरव गोगोई म्हणाले, “अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आतापर्यंत २६ वेळा म्हणाले की आम्ही व्यापाराच्या नावाखाली भारत व पाकिस्तानला इशारा दिला. दोन्ही देशांना युद्ध रोखण्यासाठी भाग पाडलं. ट्रम्प यांनी २६ वेळा दावा केला आहे की त्यांनी युद्ध थांबवलं. तसेच ते म्हणतात या युद्धात वायूदलाची पाच-सहा विमान पाडण्यात आली होती. एक-एक विमान खरेदी करण्यासाठी आपण कोट्यवधी, अब्जावधी रुपये खर्च करतो. परंतु, राजनाथ सिंह त्यावर बोलायला तयार नाहीत. आपल्याकडे ३५ राफेल विमानं आहेत, त्यातली काही पडली असतील तर ते प्रचंड मोठं नुकसान आहे. आपण आपल्या जवानांना सत्य सांगितलं पाहिजे. त्यांच्यात भ्रम निर्माण करू नये. “