Germany On H1B Visa : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच एच-१ बी व्हिसाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. या एच-१ बी व्हिसाची मोठी चर्चा सुरू आहे. एच-१बी व्हिसासाठी तब्बल १ लाख डॉलर्स म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये ८८ लाख रुपये शुल्क आता द्यावं लागणार आहे. ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयाचा सर्वाधिक फटका भारताला बसणार असल्याचं बोललं जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयाबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

अमेरिकेच्या एच-१बी व्हिसाच्या गोंधळानंतर आता भारतीयासांठी जर्मनीमधून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. ‘आम्ही आमचे नियम एका रात्रीत बदलत नाही’, असं म्हणत जर्मन राजदूतांनी अमेरिकेच्या एच-१बी व्हिसाच्या भूमिकेवर टीका करत भारतीयांसाठी जर्मनीतील जॉब आणि व्यावसाय करण्यासाठी एक प्रकारे थेट ऑफरच दिली आहे. या संदर्भातील वृत्त फायनान्शिअल एक्स्प्रेसने दिलं आहे.

भारतातील जर्मन राजदूत डॉ. फिलिप अकरमन यांनी मंगळवारी (२३ सप्टेंबर) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर करत व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये फिलिप अकरमन यांनी म्हटलं की सर्वोत्तम लोकांना नोकऱ्या देण्यावर आमचा विश्वास आहे. तसेच जर्मनीत भारतीयांचं स्वागत आहे, असं म्हणत भारतीय व्यावसायिकांचं आणि नोकरदारांचं त्यांनी स्वागत असल्याचं म्हटलं आहे.

फिलिप अकरमन म्हणाले की, ‘भारतीयांना जर्मनीमध्ये केवळ नोकऱ्या मिळत नाहीत तर खूप चांगलं कामही मिळतं. जर्मनी अधिकाधिक भारतीय व्यावसायिकांचं स्वागत करत आहे. विशेषतः आयटी, व्यवस्थापन, विज्ञान आणि तंत्रज्ञान या सारख्या क्षेत्रातील भारतीयांचं जर्मनी स्वागत करत आहे. जर्मनीमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्यांमध्ये भारतीय आहेत, ही खूप चांगली गोष्ट आहे”, असं त्यांनी म्हटलं.

जर्मन राजदूतांनी असंही स्पष्ट केलं की ते केवळ मोठ्या पगारांचे नाही तर जर्मनीच्या विकासात भारतीय व्यावसायिकांची महत्त्वाची भूमिका देखील प्रतिबिंबित करतात. भारतीय आपल्या समाजात आणि आपल्या कल्याणात मोठं योगदान देत असल्याचंही त्यांनी नमूद केलं. फिलिप अकरमन म्हणाले की, “आमचं स्थलांतर धोरण जर्मन कारसारखं काम करतं. ते विश्वासार्ह आहे, ते आधुनिक आहे. ते कोणत्याही झिगझॅगशिवाय सरळ रेषेत आहे आणि तुम्हाला कोणत्याही ब्रेकची भीती बाळगण्याची गरज नाही.”