Germany backs India in war against terrorism : भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे सध्या जर्मनीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी जयशंकर यांनी जर्मनीचे परराष्ट्र मंत्री जोहान वेडफुल यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकाच व्यासपीठावरून प्रसारमाध्यमांना संबोधित केलं. जयशंकर यांनी या जागतिक व्यासपीठावरून पाकिस्तानला इशारा दिला आहे की “भारत कुठल्याही प्रकारच्या आण्विक हल्ल्याच्या धमकीला भीक घालणार नाही. पाकिस्तानने कितीही आण्विक हल्ल्याचा आडोसा घेत भारताला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला तरी भारत घाबरणार नाही. भारत पाकिस्तानशी केवळ द्विपक्षीय चर्चा करेल. यावर कुठल्याही देशाचा आक्षेप असता कामा नये”.
एस. जयशंकर म्हणाले, “पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांविरोधात कारवाई केली आणि त्यानंतर मी लगेच बर्लिनला आलो आहे. दहशतवादाविरोधात भारताची झिरो टॉलरन्सची भूमिका (दहशतवाद सहन करणार नाही) आहे. तसेच पाकिस्तानच्या आण्विक ब्लेकमेलिंगला बळी पडणार नाही. त्याचबरोबर भारत सरकार पाकिस्तानशी केवळ द्विपक्षीय चर्चा करेल, आमचा व्यवहार तसाच असेल. याबद्दल कोणालाही कुठल्याही प्रकारची समस्या असता कामा नये, कोणाच्याही मनात गोंधळ नसावा”.
दहशतवादाविरोधातील लढाईत जर्मनीचा भारताला उघड पाठिंबा
भारताचे परराष्ट्र मंत्री म्हणाले, “प्रत्येक देशाला दहशतवादापासून स्वतःचं संरक्षण करण्याचा अधिकार आहे. आमची ही भूमिका जर्मनीने समजून घेतली आहे. त्याबद्दल मी त्यांच्या मतांचा आदर करतो. दरम्यान, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या या जर्मनी भेटीमुळे दहशतवादाच्या मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताला आणखी एक मोठा विजय मिळाला आहे. दहशतवादाविरोधातील लढाईत जर्मनीने भारताला उघडपणे पाठिंबा दिला आहे”.
जर्मनीला भारत-पाकिस्तानमधील तणावावर तोडग्याची अपेक्षा
दरम्यान, जर्मनीचे परराष्ट्र मंत्री जोहान वडेफुल यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’वर भाष्य केलं. ते म्हणाले, “भारताला दहशतवादाविरोधात स्वतःचं संरक्षण करण्याचा पूर्ण अधिकार आहे. दहशतवादाविरोधातील कोणत्याही लढाईला जर्मनी पाठिंबा देईल”. यासह वडेफुल यांनी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. जर्मनीचे परराष्ट्र मंत्री म्हणाले, “जगात कुठेही दहशतवादाला थारा मिळता कामा नये. त्यामुळेच आम्ही दहशतवादाविरोधात लढणाऱ्या प्रत्येकाला पाठिंबा देऊ. भारत आणि पाकिस्तानने युद्धबंदी केली आहे, या निर्णयाचं आम्हाला कौतुक वाटतं. आम्हाला आशा आहे की उभय देशांमधील तणावावर लवकरच तोडगा निघेल”.