Mother Killed by Adopted Daughter: अवघ्या तीन दिवसांच्या एका मुलीला जन्मदात्यांनी रस्त्यावर बेवारस सोडून दिले. त्या अनाथ मुलीला रस्त्यावर पाहून एका महिलेच्या हृदयाला पाझर फुटला आणि तिने सदर मुलीला दत्तक घेतले. मात्र त्या मुलीने मोठे झाल्यानंतर दत्तक आईलाच आयुष्यातून संपवले. ओडिशाच्या गजपती जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली असून या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तक मुलगी १३ वर्षांची असून ती आठवीत शिकते. तिने तिच्या दोन मित्रांसह ५४ वर्षीय दत्तक आई राजलक्ष्मी कर यांचा खून केला. २९ एप्रिल रोजी गजपती जिल्ह्यातील परलाखेमुंडी शहरातील भाड्याच्या घरात राजलक्ष्मी यांचा खून करण्यात आला. अल्पवयीन मुलीच्या प्रेमसंबंधाला विरोध आणि संपत्तीवर हक्क मिळविण्यासाठी सदर गुन्हा करण्यात आला.
आरोपी अल्पवयीन मुलीने राजलक्ष्मी यांना आधी गुंगीचे औषध दिले आणि नंतर उशी तोंडावर दाबून त्यांचा खून केला. यानंतर हृदयविकाराचा झटका आल्याचा बनाव करत राजलक्ष्मी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दुसऱ्या दिवशी भुवनेश्वर येथे नातेवाईकांच्या उपस्थितीत राजलक्ष्मी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राजलक्ष्मी यांना हृदयाशी संबंधित आजार होता. त्यामुळे खुनाची शंका सुरुवातीला कुणाला आली नाही.
गुन्हा कसा उघड झाला?
अंत्यसंस्कार झाल्यानंतर दोन आठवडे यासंबंधी कुणाला काही संशय आला नाही. पण राजलक्ष्मी यांचे बंधू सिबा प्रसाद मिश्रा यांच्या हाती अल्पवयीन मुलीचा मोबाइल सापडला आणि या गुन्ह्याचे बिंग फुटले. सिबा प्रसाद यांनी मोबाइल तपासला असता त्यांना इन्स्टाग्रामवर मुलीने तिच्या मित्रांशी केलेले चॅट आढळले. या चॅटमध्ये राजलक्ष्मी यांची हत्या करण्याचा आणि घरातील रोख रक्कम व सोने लंपास करण्याचा उल्लेख केला होता.
यानंतर सिबा प्रसाद यांनी १४ मे रोजी परलाखेमुंडी येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास करून अल्पवयीन मुलगी, गणेश रथ (२१) आणि त्याचा मित्र दिनेश साहू (२०) यांना अटक केली.
गजपतीचे पोलीस अधीक्षक जतिंद्र कुमार पांडा यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितले की, राजलक्ष्मी आणि त्यांच्या पतीला काही वर्षांपूर्वी भुवनेश्वर येथे रस्त्याच्या कडेला एक मुलगी आढलून आली. या जोडप्याला मुल बाळ नसल्यामुळे त्यांनी या मुलीला दत्तक घेऊन आपल्या घरी आणले.
मुलीला दत्तक घेतल्यानंतर वर्षभरातच राजलक्ष्मी यांच्या पतीचे निधन झाले होते. त्यानंतर राजलक्ष्मी यांनी एकटीने मुलीचे संगोपन करत तिला वाढवले. मुलीला चांगल्या शाळेत शिकता यावे, म्हणून त्यांनी परलाखेमुंडी येथे भाड्याने घर घेऊन राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र मधल्या काळात मुलीचे वरील दोन आरोपींबरोबर जवळीक निर्माण झाली. याला राजलक्ष्मी यांचा तीव्र विरोध होता. या कारणावरून दोघींमध्ये खटकेही उडत होते.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपी गणेश रथने मुलीला आईचा खून करण्यासाठी प्रवृत्त केले. राजलक्ष्मी यांचा खून झाल्यानंतर आपण एकत्र राहू शकतो तसेच त्यांची संपत्ती वापरू शकतो, असा विश्वास त्याने दिला. २९ एप्रिल रोजी दोन्ही आरोपींच्या योजनेनुसार तिघांनी मिळून दत्तक आईचा खून केला.