उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्य़ात काही युवकांनी छेड काढल्याने एका मुलीने स्वत:ला जाळून घेतल्यानंतर जमाव हिंसक झाल्यामुळे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन तरुण ठार झाले. या घटनेची गंभीर दखल घेऊन राज्य सरकारने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निलंबित केले असून घटनेच्या दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशीचा आदेश दिला आहे.
सध्या विदेशात असलेले मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी या घटनेची तत्काळ दखल घेऊन पोलीस अधीक्षक डी.पी. सिंग यांच्या निलंबनाचा आदेश दिल्याचे सरकारच्या अधिकृत प्रवक्त्याने लखनौ येथे सांगितले. घटनेत गुंतलेल्या लोकांविरुद्ध एफआयआर दाखल केल्यानंतर त्यांना अटक करण्याचा, तसेच घटनेची दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याचा आदेशही यादव यांनी दिला.
या प्रकाराच्या मुळाशी असलेली घटना शनिवारी रात्री घडली. जितेंद्र यादव व त्याच्या मित्राने १५ वर्षांच्या एका मुलीची तिच्या खेडय़ात छेडखानी केली. मुलीने विरोध केला असता त्यांनी तिला मारहाणही केली. घरी पोहचल्यानंतर मुलीने तिच्या कुटुंबीयांना ही घटना सांगितली व ती वरच्या मजल्यावर गेली. तेथे तिने अंगावर रॉकेल शिंपडून स्वत:ला पेटवून आत्महत्या केली. तिला गंभीर जखमी अवस्थेत इस्पितळात हलवण्यात आले, परंतु उपचारादरम्यान ती मरण पावली.
प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेमुळे संतप्त झालेले अनेक गावकरी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी बिवानेर पोलीस ठाण्यात पोहचले आणि त्यांनी विटांचे तुकडे फेकून मारले. जमावाने पोलिसांच्या एका वाहनाला आग लावली, तसेच काही वाहने ताब्यात घेतली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्यामुळे पोलिसांनी गोळीबार केला. यात तिघेजण जखमी झाले. त्यांच्यापैकी मोहित पांडे (१८) आणि कल्लू खान (२८) हे दोघे जण उपचारादरम्यान मरण पावले. तिसऱ्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे कळते. जिल्हा प्रशासनाने मृताच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची, तर जखमीसाठी १ लाख रुपयांची नुकसानभरपाई जाहीर केली आहे.आरोपी जितेंद्र यादव याला अटक करण्यात आली असून मुलीच्या कुटुंबीयांना स्थानबद्ध करण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 27th Jul 2015 रोजी प्रकाशित
छेड काढल्याने उत्तर प्रदेशात मुलीची जाळून घेऊन आत्महत्या
उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्य़ात काही युवकांनी छेड काढल्याने एका मुलीने स्वत:ला जाळून घेतल्यानंतर जमाव हिंसक झाल्यामुळे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन तरुण ठार झाले. या घटनेची गंभीर दखल घेऊन राज्य सरकारने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निलंबित केले असून घटनेच्या दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशीचा आदेश …
First published on: 27-07-2015 at 02:50 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girl done suicide in up