कुटुंबाच्या मान-सन्मानाच्या नावाखाली देशभरात अनेक ठिकाणी हिंसक कृत्य घडत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र, फक्त एका गैरसमजातून एका मुलीच्या कुटुंबीयांनी अवघ्या १२ वर्षांच्या मुलाचा निर्घृण खून करून त्याच्या मृतदेहाचे तुकडे केल्याचा धक्कादायक प्रकार बिहारमध्ये घडला आहे. या प्रकारामुळे पोलीसही चक्रावले असून त्यांनी संबंधित मुलीच्या कुटुंबीयांना आणि तिच्या चार अल्पवयीन भावांना अटक केली आहे. अल्पवयीन आरोपींना बालसुधारगृहात तर सज्ञान आरोपींना तुरुंगात ठेवण्यात आलं आहे.
हा सगळा प्रकार बिहारच्या भोजपूर जिल्ह्यातील उदवंतनगर भागात घडला आहे. १३ ऑक्टोबर रोजी मोठ्या बहिणीच्या परीक्षेसाठी मृत १२ वर्षीय मुलगा तिला परीक्षा केंद्रावर घेऊन आला होता. ही मुलगी सहाव्या इयत्तेत शिकते, तर हा मुलगा दुसऱ्या शाळेत पाचव्या इयत्तेत शिकत होता. पण आपल्या बहिणीला परीक्षेत मदत करण्यासाठी केलेली कृती आपल्या जिवावर बेतू शकते, याची या मुलाला अजिबात कल्पना नव्हती.
परीक्षेच्या कॉपीचा कागद फेकला आणि…
बहीण परीक्षेसाठी बसली असताना तिला मदत करण्यासाठी बाहेर खिडकीत उभ्या असलेल्या या मुलानं तिच्या दिशेनं उत्तरं असणारा कॉपीचा कागद फेकला. पण त्याचा नेम चुकला आणि हा कागद दुसऱ्याच एका मुलीजवळ जाऊन पडला. ती मुलगी घाबरली. तिला वाटलं, आपल्याजवळ या मुलानं टाकलेला कागद म्हणजे प्रेमपत्रच आहे. घाबरून जाऊन या मुलीनं तिच्या भावांना याबद्दल सांगितलं.
आधी मारहाण, मग निर्घृण खून
बहिणीला प्रेमपत्र लिहिलं या गैरसमजातून त्या मुलीच्या चार भावांनी परीक्षाकेंद्रावर जाऊन मृत मुलाला गंभीर मारहाण केली. त्याचं अपहरण केलं आणि त्याला अज्ञात स्थळी घेऊन गेले. या मुलाचा तपास न लागल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास केल्यानंतर चार दिवसांनी त्याच्या मृतदेहाचे तुकडे सापडले. त्याची हत्या करून मृतदेहाचे तुकडे करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला.
महाराष्ट्र ‘एटीएस’ची कारवाई ; PFI च्या पनवेल सचिवासह अन्य दोघांना अटक
यानंतर तातडीने तपास करून पोलिसांनी मुलीच्या चारही अल्पवयीन भावांना आणि तिच्या इतर सहभागी कुटुंबीयांना अटक केली. यातील अल्पवयीन चौघांना बालसुधारगृहात पाठवण्यात आलं आहे. तर इतर सज्ञान कुटुंबीयांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.