करोना विषाणूचा नवीन उपप्रकार जेएन.१ ने जागतिक आरोग्य संघटनेच्या चिंता वाढवल्या आहेत. जगभरातल्या अनेक देशांमध्ये जेएन.१ ने बाधित रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणांचे धाबे दणाणले आहेत. जेएन.१ चा भारतातही शिरकाव झाला आहे. केरळ, महाराष्ट्र, गोव्यासह भारतातल्या अनेक राज्यांमध्ये जेएन.१ बाधित रुग्ण आढळले आहेत. देशात सर्वाधिक जेएन.१ बाधित रुग्ण गोव्यात आढळले असून गोवा राज्य सरकार अलर्ट मोडवर आहे. गोव्यात आतापर्यंत जेएन.१ बाधित १९ रुग्णांची नोंद झाली असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. गोव्याच्या आरोग्य विभागाने म्हटलं आहे की, सध्या तरी आपण घाबरण्याची आवश्यकता नाही. कारण बुधवारी (२० डिसेंबर) दिवसभरात एकही नवा रुग्ण आढळलेला नाही.

पश्चिम बंगालच्या आरोग्य विभागाने सांगितलं आहे की, ते केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार एन्फ्लूएन्झासारख्या गंभीर आजारांवर आणि श्वसनाशी संबंधित संक्रमनांच्या प्रकरणांवर लक्ष ठेवणार आहेत. त्याचबरोबर गोवा सरकारही यावर लक्ष ठेवणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखालील राज्यांच्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत केंद्राने देशभरातील परिस्थितीची माहिती घेतली.

दरम्यान, गोव्यात जेएन.१ ने बाधित १९ रुग्णांची नोंद झाली असून आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी डॉ. प्रशांत सूर्यवंशी यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितलं की, गोव्यात नवीन व्हेरिएंटचे एकूण १९ रुग्ण आहेत. जीनोम सीक्वेन्सिंगच्या माध्यमातून केलेल्या चाचण्यांद्वारे याची नोंद करण्यात आली आहे. या १९ पैकी बहुसंख्य रुग्ण हे उत्तर गोव्यात आढळले आहेत. या सर्व रुग्णांमध्ये खोकला आणि सर्दीची लक्षणं पाहायला मिळाली आहेत. अनेक रुग्ण रुग्णालयांमध्ये दाखल न करता केवळ सात दिवस विलगीकरण कक्षात ठेवून बरे झाले आहेत. तसेच या रुग्णांच्या आतापर्यंतच्या प्रवासावर आम्ही लक्ष ठेवून आहोत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्रातही आढळला जेएन.१ चा रुग्ण

केरळमधल्या थिरूवअनंतपुरम येथील काराकुलम येथे ८ डिसेंबर रोजी ओमिक्रॉनचा उपप्रकार असलेल्या ‘जेएन.१’ विषाणूचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर आता महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ‘जेएन.१’चा एक रुग्ण सापडला आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने सर्व रुग्णालयांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. डिसेंबरच्या सुरुवातीपासून अमेरिका, चीन आणि सिंगापूर या देशांमध्ये ‘जेएन.१’ या करोनाच्यानवीन उपप्रकाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत.