पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या गोवा दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी एक मोठं विधान केलं आहे. त्या म्हणाल्या की, पंतप्रधान आता अजून ताकदवान बनणार आहेत कारण काँग्रेस राजकारणाबद्दल गंभीर नाही. ममता बॅनर्जी यांनी गोव्यात युतीबद्दल निर्णय न घेतल्याचा आरोपही काँग्रेसवर केला आहे. पणजीत बोलताना ममता म्हणाल्या की, काँग्रेस निर्णय घेत नाहीये आणि त्याचेच परिणाम आज देश भोगत आहे.

ममता बॅनर्जी म्हणाल्या, मी सगळं काही आत्ताच सांगू शकत नाही कारण त्यांनी राजकारणाला गांभीर्याने घेतलेलं नाही. काँग्रेसमुळेच मोदीजी आणखी ताकदवान होत आहेत. जर कोणी निर्णय घेतला नाही तर त्याचे परिणाम देशाने का भोगावेत? काँग्रेसला आधी संधी होती. पण ते माझ्या राज्यात भाजपाऐवजी माझ्याविरुद्धच लढू लागले.

तृणमूलने गोव्यातल्या सर्वच्या सर्व ४० जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.

भाजपावर निशाणा साधताना ममता म्हणाल्या, भाजपाने अच्छे दिन येणार असं आश्वासन दिलं होतं. पण हेच लोक आता देशाचा विनाश करण्याच्या प्रयत्नात आहेत. देशात डिझेल, पेट्रोल, एलपीजी सिलेंडरच्या किमती सातत्याने वाढत आहेत. जीएसटीमुळे व्यापाराला फटका बसत आहे. पण भाजपा या मुद्द्यांकडे गांभीर्याने पाहत नाही.