भगवंत मान हेच पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील.  पक्षाचे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी याबाबतची घोषणा केली. जनतेच्या हितासाठी कार्यरत राहून, राज्याला गतवैभव मिळवून देऊ असे संगरुरचे खासदार असलेल्या मान यांनी निवडीनंतर स्पष्ट केले.

आम आदमी पक्षाने मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराबाबत जनतेकडूनच मते मागवली होती. त्यासाठी १७ जानेवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत वेळ देण्यात आली होती. या काळात २१ लाख ५९ हजार जणांनी मते नोंदवली होती. त्यामध्ये आपचे पंजाब प्रदेशाध्यक्ष भगवंत मान यांच्या नावावर ९३ टक्के लोकांनी कौल दिल्याचे केजरीवाल यांनी सांगितले. काही जणांनी केजरीवाल यांचा उल्लेख केला होता. मात्र या पदासाठी  स्पर्धेत नसल्याचे सांगत, केजरीवाल यांनी त्यांना पडलेली मते बाद असल्याचे जाहीर केले. ४८ वर्षीय मान हे संगरुरमधून दोन वेळा लोकसभेवर विजयी झाले आहेत. मान यांचे नाव जाहीर होताच पक्ष कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. या वेळी मान यांचे कुटुंबीय उपस्थित होेते. संगरुर जिल्ह्यातील सतोज या मान यांच्या मुळ गावीही कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता. २०११ मध्ये भगवंत मान यांनी मनप्रीत बादल यांच्या पीपल्स पार्टी ऑफ पंजाबद्वारे राजकारणात प्रवेश केला. २०१२ मध्ये विधानसभा निवडणुकीत संगरुरमधील लेहरग्गा मतदारसंघातून काँग्रेसच्या र्रांजदर कौर भट्टल यांच्याकडून ते पराभूत झाले. २०१४ मध्ये त्यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला. संगरुर लोकसभा मतदारसंघातून अकाली दलाचे नेते सुखदेवसिंग धिंडसा यांचा पराभव केला होता. २०१९ मध्ये पुन्हा ते याच मतदारसंघातून विजयी झाले आहेत.

मद्यपी  ते मद्य सोडण्याची शपथ…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून आम आदमी पार्टीने नाव जाहीर केलेल्या भगवंत मान यांची पाश्र्वभूमी पक्षाला त्रासदायक ठरू शकते. विनोदी कलाकार म्हणून कारकिर्दीला सुरुवात करणारे मान हे मद्यपी म्हणून ओळखले जातात. लोकसभेत मद्याच्या आहारी जाऊन त्यांनी भाषणे केली होती. लोकसभेत विधेयकावरील चर्चेत सहभागी होताना दिल्लीत आम आदमी पार्टीने कोणती कामे केली याची जंत्री सांगू लागले. तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी त्यांना ही चर्चा विधेयकावर आहे याची आठवण करून द्यावी लागली होती. संसदेच्या सुरक्षा रक्षकांबरोब त्यांची मागे झटापट झाली होती. मद्यपी म्हणून मान यांच्यावर टीका होऊ लागल्याने आपचे सर्वेसर्वा अर्रंवद केजरीवल यांनी त्यांची कानउघाडणी केली होती. त्यानंतर आईच्या उपस्थितीत यापुढे मद्याला शिवणार नाही, अशी जाहीरपणे शपथ घेतली होती. आता आपण मद्याला अजिबात शिवत नाही, असे मान सांगतात. प्रचाराच्या काळात काँग्रेस, अकाली दल किंवा अर्मंरदर्रंसग हे मान यांच्या मद्यपी प्रतिमेवरून टीका करण्याची अधिक शक्यता आहे.