Bihar Crime : बिहारच्या बेगुसरायमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. ८ महिन्यांपूर्वी प्रेमविवाह झालेल्या एका जोडप्याचा मृतदेह आढळून आल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. मृत्यूपूर्वी पतीने फेसबुकवर पत्नीचा फोटो पोस्ट करत ‘अलविदा’ असं लिहिलं होतं. ही घटना बेगुसरायमधील बहादुरपूर गावात घडली आहे. शुभम कुमार आणि पत्नी मुन्नी देवी अशी मृतांची नावे असून या दोघांनी ८ महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला होता.
या घटनेबाबत कुटुंबातील सदस्यांनी सांगितलं की ते डॉक्टरांना दाखवण्यासाठी बाहेर गेले होते. त्यानंतर दुपारी परत आल्यावर घर आतमधून बंद होतं. त्यानंतर खिडकीतून पाहिलं तेव्हा शुभमने गळफास घेतल्याचं दिसून आलं, तर त्याच ठिकाणी बेडवर शुभमची पत्नी मृतावस्थेत आढळून आली होती. या घटनेची माहिती मिळताच गावात शोककळा पसरली. त्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला आहे.
सदर कुटुंबातील सदस्यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितलं की, या जोडप्यात कोणताही वाद नव्हता. तसेच घटनेच्या आधी शुभम आणि त्याच्या पत्नीने सोशल मीडियावर अलविदा अशी पोस्ट शेअर केली होती. त्यामुळे या दोघांनी जीवन संपवण्याचा अशा प्रकारचा टोकाचा निर्णय का घेतला? याची माहिती कुटुंबातील सदस्या नाही. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
या घटनेबाबत पोलिसांनी सांगितलं की, या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. शवविच्छेदन अहवाल आणि सोशल मीडियावरील पोस्टच्या आधारे घटनेची चौकशी करण्यात येत असून या घटनेमागचं कारण शोधण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. तसेच समोर आलेल्या माहितीनुसार, शुभम आणि त्याच्या पत्नीची इंस्टाग्रामवर मैत्री झाली होती. त्यानंतर त्यांनी प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या आठ महिन्यांपासून ते त्यांच्या गावात एकत्र राहत होते. मात्र, त्यांनी अचानक अशा प्रकारचं टोकाचं पाऊल उचलल्यामुळे खळबळ उडाली आहे.