सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षेतील पहिल्या २०० गुणवंत विद्यार्थ्यांना मनुष्यबळ विकास मंत्रालय प्रत्येकी एक लाख रुपयांचे रोख बक्षीस देणार आहे, असे आज जाहीर करण्यात आले. सरकारी शाळेत शिकून हे यश मिळवणाऱ्या मुलांनाच हे बक्षीस दिले जाणार आहे.
मनुष्यबळ विकास मंत्री एम.एम. पल्लम राजू यांनी या प्रस्तावाला बारावीच्या निकालानंतर मंजुरी दिली आहे. विद्यार्थ्यांच्या कामगिरीची प्रशंसा करताना राजू यांनी असे सांगितले की, सीबीएसईच्या बारावी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचे सर्वात जास्त ८२.१० टक्के इतके प्रमाण या वेळी गाठले गेले आहे.
सीबीएसई अभ्यासक्रमाशी संलग्न असलेल्या सरकारी शाळांमधून ९ वी ते १२ वी पर्यंत शिकलेल्या व यंदा बारावीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
बारावीच्या विज्ञान, वाणिज्य, मानव्य तसेच व्यावसायिक या सर्व शाखातील प्रत्येकी ५० विद्यार्थ्यांना ही बक्षिसे दिली जाणार आहेत.