कांद्याचे भाव दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे खडबडून जागे झालेल्या केंद्र सरकारने आता दिल्लीसह इतर राज्य सरकारांशी चर्चा करण्यास सुरुवात केलीये. कांद्याचे भाव खाली आणण्यासाठी काय उपाय योजता येतील, याचा केंद्र सरकारच्या अन्नपुरवठा मंत्रालयाकडून शोध घेण्यात येऊ लागला आहे. आगामी निवडणुकीत कांद्यामुळे वांदा व्हायला नको, म्हणून केंद्र सरकार सावध पवित्रा घेतला आहे.
केंद्रीय अन्नपुरवठा राज्यमंत्री के. व्ही. थॉमस बुधवारी संसदेबाहेर पत्रकारांना म्हणाले, गेल्या दोन दिवसांत कांद्याचे भाव वेगाने वाढले आहेत. कांद्याचे उत्पादन मात्र घटले आहे. परदेशापेक्षा भारतातच कांद्याचा भाव जास्त असल्यामुळे कांदा निर्यात बंद करण्यात आली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित आणि इतर राज्य सरकारांशी आम्ही चर्चा करीत आहोत. दिल्लीतील कांद्याचे भाव खाली आणण्यासाठी नाशिकहून कांदा मागविण्यासंदर्भात कृषिमंत्री शरद पवार यांच्याशी चर्चा करणार आहोत.
दरम्यान, कांद्याची साठेबाजी करून कृत्रिम भाववाढ करणाऱया व्यापाऱयांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी मुंबईमध्ये सांगितले.