“ऑक्टोबर महिन्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे हिमालयाच्या उतारावरील संपृक्त खडक-मातीचा ढिगारा खाली वाहून आला, त्यामुळे दार्जिलिंगमध्ये भीषण भूस्खलन झाले,” अशी माहिती भारतीय भूगर्भीय सर्वेक्षणाने (जीएसआय) बुधवारी दिली. आपण याबाबत आधीच धोक्याचा इशारा वर्तवला होता, असेही ‘जीएसआय’ने सांगितले.
ऑक्टोबरमधील मुसळधार पावसामुळे हिमालय प्रदेशाचे नैसर्गिक स्थैर्य लक्षणीयरित्या कमकुवत झाले आहे, असे ‘जीएसआय’चे उपमहासंचालक डॉ. सैबल घोष यांनी सांगितले. दार्जिलिंगला ४ ऑक्टोबर रोजी मुसळधार पाऊस झाला, त्याच्या काहीच तास आधी दुपारी २.१५ वाजता दार्जिलिंगला ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला होता. दार्जिलिंग जिल्ह्यातील दार्जिलिंग पुलबाजार, जोरबंगलो सुकियापोखरी, कुर्सिआँग, मिरिक आणि रंगली रंगलीओट मंडळ या भागांमध्ये मुसळधा पाऊस होण्याचा अंदाज होता, असे डॉ. घोष म्हणाले.
संपूर्ण पावसाळ्यानंतर ऑक्टोबरमध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे हिमालयाच्या उतारभागांना तीव्र धोका निर्माण झाला होता. डॉ. घोष म्हणाले, “हिमालयात जून ते ऑक्टोबर हा मॉन्सूनचा कालावधी असतो. या काळात भूस्खलनाचा धोका नेहमीच जास्त असतो. पण ऑक्टोबरमधील पाऊस विशेष धोकादायक असतो, कारण तोपर्यंत जमीन पूर्णपणे संपृक्त (सॅच्युरेटेड) झालेली असते.”
अतिवृष्टी धोकादायक
डॉ. घोष यांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ आणि ५ ऑक्टोबर या दोन दिवशी कुर्सिआँग येथे ३९३ मिमी पर्जन्यमान नोंदवले गेले. एका दिवसात १३० मिमी ते १५० मिमी पाऊस झाला तरी भूस्खलन होऊ शकते. ऑक्टोबरमध्ये हिमालयात इतकी अतिवृष्टी झाली तर तो या भागासाठी फार धोकादायक असतो. अगदी मध्यम पावसानेही मोठे भूस्खलन होऊ शकते. ५ ऑक्टोबरलाही पाऊस सुरू राहिला असता तर अधिक नुकसान होण्याचा धोका होता.