scorecardresearch

गुजरातमध्ये भाजपचे माजी मंत्री व्यास यांचा काँग्रेसप्रवेश

व्यास यांनी राष्ट्रहितासाठी आपण कटिबद्ध असून काँग्रेस जी जबाबदारी आपणास देईल ती आपण स्वीकारू, असे या वेळी सांगितले.

gujarat assembly polls ex bjp minister jay narayan vyas joins congress
गुजरातचे माजी मंत्री जयनारायण व्यास यांनी सोमवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. photo source ; indian express

अहमदाबाद : गुजरातचे माजी मंत्री जयनारायण व्यास यांनी सोमवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना विविध वाहिन्यांवरील चर्चामध्ये गुजरात सरकारची बाजू ते समर्थपणे मांडत असल्याने ‘गुजरातच्या भाजप सरकारचा चेहरा’ अशी त्यांची प्रसारमाध्यमांत एकेकाळी ओळख होती. व्यास यांचे पुत्र समीर व्यास यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला. व्यास यांनी राष्ट्रहितासाठी आपण कटिबद्ध असून काँग्रेस जी जबाबदारी आपणास देईल ती आपण स्वीकारू, असे या वेळी सांगितले.

गुजरात सरकारचे माजी प्रवक्ते असलेल्या व्यास यांनी सोमवारी भाजप सोडण्याच्या आपल्या निर्णयाविषयी बोलताना सांगितले, की एक विशाल वटवृक्षाचा विस्तार होताना त्याखाली अन्य कुठल्याही वनस्पती वाढू शकत नाहीत. या महिन्याच्या प्रारंभी भाजप सोडण्याचा निर्णय घेतलेल्या ७५ वर्षीय व्यास यांनी सोमवारी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी या वेळी व्यास यांचे स्वागत केले. व्यास हे भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे (आयआयटी, मुंबई) पदवीधर असून, त्यांनी गुजरातच्या भाजप सरकारमध्ये नरेंद्र मोदींच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात २००७ ते २०१२ दरम्यान आरोग्य आणि कुटुंबकल्याण खात्याचे मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती. त्यांचा २०१२ आणि २०१७ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता.

काँग्रेसमधील लोकशाहीची स्तुती

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना व्यास यांनी काँग्रेसमधील पक्षांतर्गत लोकशाहीबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पक्षाची प्रशंसा केली. गेल्या काही वर्षांत गुजरातच्या मुख्यमंत्री बदलाचे आणि २०२१ मध्ये सर्व मंत्रिमंडळ बदलण्याचे भाजपचे निर्णय गुजरातसाठी हितकारक नव्हते, असे व्यास यांनी सांगितले. गुजरातचे भले व्हावे असे ज्यांना वाटते त्यांनी आता बोलले पाहिजे, ठाम भूमिका घेतली पाहिजे. आपण भारत जोडो यात्रेला पाहत आहोत. राहुल गांधी हे केवळ काँग्रेसचेच नाहीत तर सर्वाचे नेते आहे. लोकशाहीवर विश्वास ठेवणारे ते सच्चे भारतीय नेते आहेत. काँग्रेसच्या अध्यक्ष निवडीच्या पक्षांतर्गत प्रक्रियेचीही त्यांनी प्रशंसा केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 02:11 IST

संबंधित बातम्या