पाकिस्तानमध्ये अशांत परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बलुचिस्तानमधील ग्वादर बंदरावर अज्ञात हल्लेखोरांनी आज गोळीबार करण्याची घटना घडली. पाकिस्तानातील माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, बंदुका आणि स्फोटके घेऊन काही हल्लेखोरांनी ग्वादर बंदराच्या परिसरात बेछूट गोळीबार सुरू केला. हल्लेखोर एवढ्यावरच न थांबता ते बंदराच्या आतील इमारतीतही घुसले. बंदराच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षा दलानेही या हल्ल्याला तात्काळ प्रत्युत्तर देत प्रतिहल्ला चढवला. पाकिस्तानमधील वृत्तपत्र डॉनने दिलेल्या बातमीनुसार, पोलीस आणि सुरक्षा दलाने केलेल्या संयुक्त कारवाईमध्ये आठ हल्लेखोर मारले गेले आहेत.
पुतिन, झेलेन्स्की यांच्याशी पंतप्रधान मोदींची चर्चा; लोकसभा निवडणुकीनंतर दौरा करण्यासाठी निमंत्रण
या हल्ल्यानंतर बलुचिस्तान प्रांताचे मुख्यमंत्री सर्फराझ बुग्टी यांनी एक्सवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “आठ अतिरेक्यांनी ग्वादर पोर्ट प्राधिकरणाच्या आवारात घुसून हल्ला चढविला. सुरक्षा दलाने आठही जणांचा खात्मा केला आहे. जो कुणी अतिरेकी हल्ल्याचा मार्ग स्वीकारेल, त्याचा अशाचप्रकारे खात्मा केला जाईल, हा संदेश यामाध्यमातून आम्ही देऊ इच्छितो. पाकिस्तानसाठी ज्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून अतिरेक्यांना कंठस्नान घातले, त्यांचे आभार व्यक्त करतो.”
पाकिस्तानच्या एक्सप्रेस ट्रिब्युन वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार पाकिस्तानने बंदी घातलेल्या बलुचिस्तान लिबरेशन आर्मशी (BLA) संबंधित असलेल्या माजीद ब्रिगेडने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
बंदराच्या आवारात जोरदार गोळीबार आणि स्फोट घडून आल्यामुळे आजूबाजूचा परिसर हादरून गेला. ग्वादर बंदरावर चीनच्या भागीदारीत अनेक कामं सुरू आहेत. चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडोरच्यादृष्टीने ग्वादर बंदराचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. बीजिंगच्या बेल्ट अँड रोड इनिशिटिव्हच्या अंतर्गत ग्वादर बंदराचा विकास केला जात आहे.
या बंदरावर मोठ्या संख्येने चीनी कर्मचारीदेखील काम करत आहेत. चीनचे नागरिक काम करत असलेल्या प्रकल्पस्थळावर याआधीही अनेक पाकिस्तानी अतिरेक्यांनी हल्ले चढवले आहेत. ऑगस्ट २०२३ मध्ये काही हल्लेखोरांनी ग्वादरमधील चीनी नागरिकांच्या एका पथकावर हल्ला केला होता. त्यावेळी बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. ताज्या हल्ल्यानंतर आता चीनच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.